लंडन : अग्नितांडवात किमान 65 मृत्युमुखी?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

अद्यापी या इमारतीमधील किमान 65 नागरिकांचा पत्ता लागलेला नाही. हे सर्व बेपत्ता नागरिक मृत्युमुखी पडल्याची भीती आहे

लंडन - ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडन येथील "ग्रेनफेल टॉवर' या इमारतीस लागलेल्या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 65 पर्यंत जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. या भीषण अग्नितांडवामध्ये किमान 17 मृत्युमुखी पडल्याचे आत्तापर्यंत निश्‍चित झाले आहे. मात्र अद्यापी या इमारतीमधील किमान 65 नागरिकांचा पत्ता लागलेला नाही. हे सर्व बेपत्ता नागरिक मृत्युमुखी पडल्याची भीती आहे.

या अपघातामागील कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असून ब्रिटीश पंतप्रधान यांनी या घटनेची कसून चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. या इमारतीची सुरक्षा धोक्‍यात असल्याचे इशारे याआधी देण्यात आल्याचा दावा येथील स्थानिकांनी केला आहे. या इमारतीच्या सुशोभी करणावर नुकताच तब्बल 87 लाख पौंड इतका खर्च करण्यात आला होता. यावेळी या इमारतीच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

लहानग्यांचा आक्रोश
संपूर्ण इमारतीनेच पेट घेतल्यामुळे अनेक जण घरांच्या खिडक्‍यांमधून मदतीसाठी आक्रोश करतानाचे चित्र भयावह होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. लहान मुलांच्या किंकाळ्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचा थरकाप उडाला. एका महिलेने नऊव्या किंवा दहाव्या मजल्यावरून आपल्या लहान मुलाला इमारतीच्या जवळ उभ्या असलेल्या गर्दीच्या दिशेने फेकले. त्या वेळी प्रसंगावधान राखून एका व्यक्तीने त्या मुलाला झेलले.

संपूर्ण इमारतच अवघ्या काही मिनिटांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आग विझवण्यात प्रचंड अडचण आली होती. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: At least 65 dead in London Fire?