आयर्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समलिंगी व्यक्ती 

पीटीआय
सोमवार, 22 मे 2017

माझ्या मतांची मी मोजणी करीत नाही. सहकाऱ्यांनी दिलेल्या मोठ्या पाठिंब्याबद्दल मी आभारी असून, पुढील घडामोडींकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो.
- लिओ वरदकर, पंतप्रधानपदाचे उमेदवार, आयर्लंड

डब्लिन - भारतीय वंशाचे मंत्री लिओ वरदकर हे आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. वरदकर यांची निवड झाल्यास ते आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरतील.

वरदकर हे 38 वर्षांचे असून, त्यांचा जन्म डब्लिन येथे झाला. ते डॉक्‍टर असून, त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईतील, तर त्यांची आई आयर्लंडमधील आहे. ते आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान होण्याची मोठी शक्‍यता व्यक्त होत आहे. वरदकर हे सध्या समाजकल्याण मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी वरदकर यांच्या पाठीशी असून, संसदेतील बहुतांश सदस्यांनी त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे.

पंतप्रधान एन्डा केनी यांनी राजीनामा दिल्यानंतर वरदकर यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारीची घोषणा केली. केनी यांचा उत्तराधिकारी 2 जूनला निवडण्यात येणार आहे. आयर्लंडची संसद नव्या नेत्यावर पंतप्रधान म्हणून शिक्कामोर्तब करणार आहे. वरदकर यांच्यासमोर गृहनिर्माणमंत्री सिमॉन कॉवेनी यांचे आव्हान आहे. आयर्लंडने 2015 मध्ये समलिंगी विवाहांना मान्यता दिली होती. त्यामुळे समलिंगी विवाहांना मान्यता देणारा जगातील तो पहिला देश ठरला होता. याचवेळी वरदकर यांनी समलिंगी असल्याचे जाहीर केले होते.

माझ्या मतांची मी मोजणी करीत नाही. सहकाऱ्यांनी दिलेल्या मोठ्या पाठिंब्याबद्दल मी आभारी असून, पुढील घडामोडींकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो.
- लिओ वरदकर, पंतप्रधानपदाचे उमेदवार, आयर्लंड

Web Title: Leo Varadkar leads race to become Ireland's next Prime Minister