
Liz Truss : महागाईवर नियंत्रणासाठी ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान आणणार 'धाडसी योजना'
लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर लिझ ट्रस यांनी सोमवारी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक 'धाडसी योजना' जाहीर केली. ब्रिटनसध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. भारतानं नुकतंच ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळं पुढचा काळ ब्रिटनसाठी आणि भारतासाठी महत्वाचा असणार आहे. (Liz Truss Britain new prime minister will bring a bold plan to curb inflation)
कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे भारतीय वंशाचे मंत्री ऋषी सुनक यांना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत मागे टाकत पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर लिझ ट्रस आपल्या पहिल्या भाषणात म्हणाल्या, "मी ऊर्जा संकट, ऊर्जा पुरवठा आणि राष्ट्रीय आरोग्य सेवा या दीर्घकालीन समस्यांवर कर कमी करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी एक धाडसी योजना सादर करणार आहे"
युकेला मागे टाकत भारत बनला जगातील पाचवी अर्थव्यवस्था
सन 2021 च्या शेवटच्या तीन महिन्यात भारतानं ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य गाठलं. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टच्या (जीडीपी) आकडेवारीनुसार हे 'कॅल्क्युलेशन' अमेरिकन डॉलरवर आधारित आहे.
ब्रिटनमध्ये चार दशकांतील सर्वात तीव्र महागाई
ब्रिटनमध्ये सध्या चार दशकांतील सर्वात तीव्र महागाई आणि मंदीची स्थिती आहे. बँक ऑफ इंग्लंडचा इशारा या बाबतीत चिंताजनक असून, अशी परिस्थिती 2024 पर्यंत कायम राहू शकते, असं ब्रिटनमधील या मध्यवर्ती बँकेनं म्हटलं आहे.