ब्रिटिश एअरवेजची सेवा लंडनमध्ये ठप्प

पीटीआय
सोमवार, 29 मे 2017

यंत्रणेतील बिघाडावर उपाय शोधण्यासाठी आमचे माहिती तंत्रज्ञान कर्मचारी अथकपणे प्रयत्न करीत आहे. ही समस्या वीज पुरवठ्यातील दोषामुळे झाली असावी, असा अंदाज आहे. हा सायबर हल्ला असण्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
- ऍलेक्‍स क्रूज, मुख्य कार्यकारी अधिकारी, ब्रिटिश एअरवेज

लंडन : ब्रिटिश एअरवेजने माहिती तंत्रज्ञान व्यवस्थेतील बिघाडामुळे लंडनमधील हिथ्रो आणि गॅटविक विमानतळावरील सर्व उड्डाणे रविवारी रद्द केली. त्यानंतर कंपनीला काही प्रमाणात सेवा पूर्ववत करण्यात यश आले आहे. यामुळे हजारो प्रवासी या विमानतळांवर अडकून पडले आहेत. यंत्रणेतील बिघाडाला ब्रिटिश एअरवेजने भारतातून केलेले आउटसोर्सिंग कारणीभूत असल्याचा आरोप कंपनीच्या कर्मचारी संघटनेने केला आहे.

काल (शनिवारी) माहिती तंत्रज्ञान यंत्रणेत बिघाड झाल्याने ब्रिटिश एअरवेजने हिथ्रो आणि गॅटविक या विमानतळांवरील उड्डाणे रद्द केली होती. नंतर कंपनीने या दोन्ही विमानतळांवरील आजची सर्व उडाणे रद्द केली. यामुळे विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. त्यांना नंतर प्रवासाचा अथवा तिकिटाच्या परताव्याचा पर्याय देण्यात आला आहे.
दरम्यान, कंपनीतील "जीएमबी' कर्मचारी संघटनेने या बिघाडीसाठी कंपनीने भारतातून केलेले आउटसोर्सिंग जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. कंपनीने मागील वर्षी माहिती तंत्रज्ञान सेवेचे भारतातून आउटसोर्सिंग सुरू केल्याने माहिती तंत्रज्ञान विभागातील शेकडो कर्मचारी अतिरिक्त ठरले होते. या निर्णयाच्या विरोधात कर्मचारी संघटनेने आंदोलनही केले होते.
ब्रिटिश एअरवेजमध्ये 35 हजार कर्मचारी आहेत. कंपनी दरवर्षी एक हजार कर्मचाऱ्यांची भरती करते. ब्रिटनमधील उच्च कौशल्य असलेल्या तरुणांना चांगल्या वेतनाचा रोजगार पुरविण्याचे काम कंपनी करीत आहे. कंपनीने गेल्या वर्षी टीसीएसकडे माहिती तंत्रज्ञान सेवेचे काम दिले होते. टीसीएसने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title: london news british airways service stalled