सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये सात तास वीज गायब!

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

शुक्रवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजल्यापासून सॅन फ्रॅन्सिस्कोचा वीज पुरवठा बंद पडला. या घटनेचा परिणाम जवळपास 95 हजार ग्राहकांवर झाला. अखेर स्थानिक प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी सहा वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.

सॅन फ्रॅन्सिस्को: एका वीजकेंद्रामध्ये लागलेल्या आगीमुळे सॅन फ्रॅन्सिस्कोला काल (शुक्रवार) सात तास वीजेशिवायच काढावे लागले. संपूर्ण शहराचाच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे वाहतुकीच्या सिग्नलपासून शहरातील प्रसिद्ध केबल कारपर्यंत सर्वांवरच त्याचा परिणाम झाला. 

शुक्रवारी ऐन कामाच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला. 'पॅसिफिक गॅस अँड इलेक्‍ट्रिक कंपनी' या वीजपुरवठादार कंपनीच्या एका उपकेंद्रामध्ये आग लागली. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली. शुक्रवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजल्यापासून सॅन फ्रॅन्सिस्कोचा वीज पुरवठा बंद पडला. यामुळे सॅन फ्रॅन्सिकोमधील बहुतांश कार्यालयांमध्ये काल काहीही कामकाज होऊ शकले नाही. या गोंधळामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही; मात्र कॉफी शॉपपासून मोठ्या बँकांपर्यंत सर्वांनाच या घटनेचा आर्थिक फटका बसला. या घटनेचा परिणाम जवळपास 95 हजार ग्राहकांवर झाला. अखेर स्थानिक प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी सहा वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. 

शहरातील 21 शाळांवरही याचा परिणाम झाला. मात्र, तरीही बहुतांश शाळांनी नेहमीप्रमाणेच वर्ग घेतले. तीन रुग्णालयांना शस्त्रक्रियांसाठी जनरेटर बॅकअपचा आधार घ्यावा लागला; तर इतरांनी पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. 

सॅन फ्रॅन्सिस्कोमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाज मात्र सुरळीत सुरू होते. ही घटना म्हणजे दहशतवादी कृत्य असल्याची शक्‍यता अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने फेटाळली. 'या घडामोडींवर आमचे लक्ष आहे; पण सध्या आम्ही त्याचा तपास करत नाही,' अशी माहिती 'एफबीआय'ने दिली.

Web Title: Major power outage in San Francisco