मलाला युसूफझाई तब्बल 6 वर्षांनी पाकिस्तानात परतली

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

संवेदनशिलतेच्या दृष्टीने तिच्या या दौऱ्याच्या नियोजनाबाबत गुप्तता पाळण्यात आली असून, चार दिवसांच्या या दौऱ्यात ती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांची भेट घेईल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

इस्लामाबाद : नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई ही गुरूवारी पाकिस्तानात परतली आहे. पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षण स्वातंत्र्यासाठी तिने लहान वयात लढा दिला होता, त्यामुळे 2012 साली तालीबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर प्रथमच ती मायदेशी परतली आहे. 

 malala yousafzai

संवेदनशिलतेच्या दृष्टीने तिच्या या दौऱ्याच्या नियोजनाबाबत गुप्तता पाळण्यात आली असून, चार दिवसांच्या या दौऱ्यात ती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांची भेट घेईल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

20 वर्षीय मलाला तिच्या पालकांसोबत पाकिस्तानात आली असून, इस्लामाबादच्या बेनझीर भुट्टो विमानतळावरून येताना तिच्यासाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती, अशी माहिती पाकिस्तानी माध्यामातून प्रसारित करण्यात आली आहे. ती पाकिस्तानात परतल्यामुळे पाकिस्तानी नागरिकही आनंदी आहेत, अशा पोस्ट अनेकांनी ट्विटरवर टाकल्या आहेत.

पाकिस्तानातील राजकारणी सईद अली रजा अबीदी यांनी ट्विटरवर लिहिले की, "पाकिस्तानची बहादूर व संवेदनक्षम कन्या आपल्या देशात परत आली आहे, मी तिचे स्वागत करतो." घरातील काही जुन्या विचारांच्या व परंपरावादी लोकांना अजूनही ती पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करणारी वाटते. 

तेथील आघाडीचे पत्रकार हमीद मीर यांनी विरोधकांना मलालाच्या या दौऱ्याबद्दल वाईट बोलण्यापासून रोखले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमे ही मोठ्या प्रमाणात या दौऱ्याच्या बातम्या प्रसिद्ध करत आहेत, इथल्याच लोकांनी वाईट भाषा वापरल्यास पाकिस्तानची प्रतिमा डागाळली जाईल, असेही त्यांनी सांगितले.  

मलाला ही मानवाधिकार व पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षण प्रचारासाठी जागतिक प्रतीक बनली आहे. तिला 9 ऑक्टोबर 2012 साली पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात शाळेत जात असताना तालीबान्यांकडून स्कूलबस अडवून मलाला कोण आहे, असे विचारण्यात आले व तिच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात ती गंभीर जखमी झाली होती.    

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम या शहरात तिच्यावर उपचार करण्यात आले व तिचे उर्वरित शिक्षणही तिथेच पूर्ण करण्याचा निर्णय तिने घेतला. 2014 मध्ये तिला शांततेचा सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार देण्यात आला. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीत पुढील शिक्षण घेत, तिने मुलींच्या शिक्षण प्रसाराचे काम चालूच ठेवले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malala Yousafzai returns pakistan after 6 years