ऑफिसमध्ये फेसबुक उघडताच कानाखाली मारणार; दर तासाला तिला मिळतात इतके पैसे | Facebook | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A San Franciso-based blogger, founder of wearable devices Pavlok, Maneesh Sethi

ऑफिसमध्ये फेसबुक उघडताच कानाखाली मारणार; दर तासाला तिला मिळतात इतके पैसे

कंपनीतील विविध कामांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र बॉसला कानाखाली मारण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? तुम्हीसुद्धा अवाक् झालात ना? पण हे खरं आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील ब्लॉगर आणि वेअरेबल डिव्हाइसेस पावलोकचे Pavlok संस्थापक मनिष सेठी Maneesh Sethi यांनी अशा एका महिलेला कामावर ठेवलं आहे, जी त्यांच्या कानशिलात लगावेल. मनिष यांनी असा अजब निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर जेव्हा जेव्हा ते फेसबुक Facebook ही साइट उघडतील, तेव्हा ती महिला त्यांच्या कानशिलात लगावेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे टेस्ला या जगविख्यात कंपनीचे सीईओ इलॉन मस्क Elon Musk यांनीसुद्धा या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

मनिष सेठी यांनी या महिलेला अमेरिकेतील क्लासिफाइड जाहिरातींची वेबसाइट क्रेगलिस्टच्या माध्यमातून निवडलं आहे. संबंधित महिलेला प्रत्येक तासासाठी ८ डॉलर्स मिळतात. यासाठी तिला सेठी यांच्या शेजारी बसून काम करावं लागतं आणि त्यांनी फेसबुक उघडल्यास त्यांना कानाखाली मारावी लागेल. सेठी यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं की, कारा नावाच्या या महिलेला कामावर घेतल्यानंतर त्यांची काम करण्याची क्षमता ही 35-40% वरून 98% पर्यंत वाढली. या व्हिडीओने अब्जाधीश इलॉन मस्क यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा: इलॉन मस्क यांनी पाळला शब्द; ट्विटर पोलनंतर विकले ११० कोटी रुपयांचे शेअर्स

सेठी यांच्या व्हिडीओवर कमेंट करत इलॉन मस्क यांनी आगीचे इमोजी पोस्ट केले आहेत. सेठी यांच्या पावलोक कंपनीचा रिस्टबँड एखाद्या व्यक्तीला चांगल्या सवयी अंगीकारण्यास आणि वाईट सवयी सोडण्यास मदत करतो. जास्त झोपल्यास, खूप फास्ट फूड खाल्ल्यास, नखं चावल्यास, सिगारेट ओढल्यास हा बँड हलकासा इलेक्ट्रीक शॉक देतो. पावलॉकच्या माहितीनुसार, २० हजार लोकांनी या उपकरणाचा वापर करून त्यांच्या वाईट सवयी कायमच्या सोडल्या आहेत.

loading image
go to top