मँचेस्टरचा हल्ला अनपेक्षित नाही

राजीव रंजन तिवारी
बुधवार, 24 मे 2017

भारत आणि इतर दक्षिण आशियाई देश अनेक वर्षे दहशतवाला तोंड देत असताना त्यांना समजावून घेणे आता युरोपसाठी आवश्‍यक आहे. दहशतवाद संपविण्याबाबत जगभर चर्चा होत असली, तरी तो संपण्याऐवजी पसरत आहे, याचा विचार होणे आवश्‍यक आहे.

मॅंचेस्टरमध्ये झालेला हा हल्ला अनपेक्षित निश्‍चितच नाही. 'इसिस'ने युरोपमध्ये आपले जाळे पसरले असून दहशतवादी हल्ले करण्यास सज्ज आहेत, असा इशारा युरो पोलिसांनी गेल्याच वर्षी दिला होता. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हल्ले केले जाऊ शकतात, असेही सांगण्यात आले होते. यामुळेच काल झालेला हल्ला अनपेक्षित म्हणता येणार नाही. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमीच असला तरी यामुळे युरोपीय आणि विकसित देशांना यामुळे एक संदेश मिळाला आहे.

भारत आणि इतर दक्षिण आशियाई देश अनेक वर्षे दहशतवाला तोंड देत असताना त्यांना समजावून घेणे आता युरोपसाठी आवश्‍यक आहे. दहशतवाद संपविण्याबाबत जगभर चर्चा होत असली, तरी तो संपण्याऐवजी पसरत आहे, याचा विचार होणे आवश्‍यक आहे.

आगामी काळात युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याची 'इसिस'ची योजना असल्याचे युरो पोलिसांनी 2016 मध्ये दिलेल्या अहवालात सांगितले होते. 'इसिस'विरोधात जे देश कारवाई करत आहेत, त्यांना लक्ष्य केले जात आहे. फ्रान्स आणि ब्रिटन हे प्रमुख लक्ष्य असतील, असेही अहवालात म्हटले होते. इराक आणि सीरियामध्ये 'इसिस' कमजोर पडत चालली असल्याने या संघटनेत सहभागी झालेले युरोपमधील युवक मायदेशी परतत असल्याने धोका आणखी वाढला आहे. अशा मूलतत्ववादी युवकांची संख्या हजारोंमध्ये आहे. हे लोक हल्ले करण्यासाठी कारबॉंबचा वापर करु शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

'इसिस'मध्ये रासायनिक हल्ला करण्याची क्षमता असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. इराक आणि सीरियामध्ये दहशतवादी सैनिकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना प्रामुख्याने लक्ष्य करत असतात. युरोपात मात्र ते आपली रणनीती बदलून हल्ला करण्यास सोप्या अशा सार्वजनिक ठिकाणी स्फोट घडवत सामान्य नागरिकांना लक्ष्य करू शकतात. या सर्व शक्‍यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागणार आहे.

Web Title: manchester attack not unexpected