भीती, धावपळ आणि मदतीचे हात

पीटीआय
बुधवार, 24 मे 2017

हल्ला मोठा झाला असला तरी आणि भीतीचे वातावरण असतानाही नागरिक एकमेकांना मदत करत माणुसकीही दाखवत होते.

मँचेस्टर : अरियाना ग्रॅंडेची कॉन्सर्ट संपताच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना कानठळ्या बसविणारे स्फोट ऐकू आले आणि काही काळ वातावरण सुन्न झाले. दहशतवादी हल्ला झाल्याचे बातमी पसरताच नागरिकांमध्ये प्रचंड धावपळीला सुरवात झाली.

दहशतवाद्यांनी सार्वजनिक ठिकाणी बॉंबस्फोट करत सामान्य नागरिकांना लक्ष्य केले. या स्फोटानंतर त्या ठिकाणी मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडले होते. जखमी झालेले नागरिक मदतीसाठी हाका मारत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हल्ला मोठा झाला असला तरी आणि भीतीचे वातावरण असतानाही नागरिक एकमेकांना मदत करत माणुसकीही दाखवत होते. कॉन्सर्टबाहेर आपल्या पत्नी आणि मुलीची वाट पाहत असलेल्या अँडी होले हे स्फोटामुळे तीस फूट दूर फेकले गेले. त्यांना आणि त्यांच्यासारख्या अनेकांना इतर नागरिकांनी तातडीने मदत केली.

स्फोट झाल्याचे समजल्यानंतर कॉन्सर्टला आलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना काळजी वाटल्याने त्यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करण्यास आणि पोलिसांना संपर्क साधण्यास सुरवात केली. तसेच, जगभरातूनही सोशल मीडियावर हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

Web Title: manchester blast : fear, running, helping hands