संघर्ष स्वातंत्र्याचे; कॅटॅलोनिया अन्‌ कुर्दिस्तानचे 

मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

स्कॉटलॅंड व वेल्श ब्रिटनपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश म्हणून जागतिक पटलावर येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. केव्हा न केव्हा ते स्वतंत्र होणार. नंतर ब्रिटनच्या नकाशाकडे आपण जेव्हा पाहू, तेव्हा त्याचे स्वरूप "ग्रेट ब्रिटन" न राहता "लिटल ब्रिटन" असे होईल." कधीही सूर्य न मावळणाऱ्या या देशावरील सूर्य ऐतिहासिक व राजकीय दृष्टीने मावळलेला असेल...

माजी परराष्ट्र सचिव रंजन मथाय यांनी "ब्रेक्‍झिट" या विषयावर झालेल्या एका परिसंवादात अलीकडे सांगितले होते, "ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यावर स्कॉटलॅंड व वेल्श ब्रिटनपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश म्हणून जागतिक पटलावर येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. केव्हा न केव्हा ते स्वतंत्र होणार. नंतर ब्रिटनच्या नकाशाकडे आपण जेव्हा पाहू, तेव्हा त्याचे स्वरूप "ग्रेट ब्रिटन" न राहता "लिटल ब्रिटन" असे होईल." कधीही सूर्य न मावळणाऱ्या या देशावरील सूर्य ऐतिहासिक व राजकीय दृष्टीने मावळलेला असेल, असाही संकेत त्यांनी दिला. स्कॉटलॅंडनंतर स्वातंत्र्याचे अलीकडे ऐरणीवर आलेले दोन संघर्ष म्हणजे कॅटॅलोनिया (स्पेन) व कुर्दिस्तानच्या (इराक) निर्मितीसाठी चाललेली तीव्र जनआंदोलने व जनमत कौल, हे होत. 

पाश्‍चात्य देशांपैकी क्वेबेकचे उदाहरण पाहू. क्वेबेकच्या स्वातंत्र्यासाठी कॅनडामध्ये 1980 व 1995 मध्ये दोन वेळा जनमत घेण्यात आले होते. 1980 मध्ये झालेल्या मतदानात कॅनडाच्या बाजूने 59.56 टक्के क्वेबेकच्या बाजूने 40.44 टक्के मतदान झाले. तर 1995 मध्ये झालेल्या जनमत कौलात कॅनडाच्या बाजूने 50.58 टक्के व क्वेबेकच्या बाजूने 49.42 टक्के मतदान झाले. दोन्ही वेळेस क्वेबेकच्या स्वातंत्र्याचा कौल फेटाळण्यात आला असला, तरी 1995 मधील मतदानात क्वेबेकच्या स्वातंत्र्याचे पारडे तब्बल 9.42 टक्‍क्‍यांनी जड झाले. याचा अर्थ भविष्यात कॅनडापासून क्वेबेक वेगळा होण्याची दाट शक्‍यता दिसते. 

भारतातील स्पेनचे माजी राजदूत गुस्ताव द ऍरिस्टेगुई यांची गेल्या वर्षी भेट घेता, "कॅटॅलोनियामध्ये संघर्षाची ठिणगी पडेल," असे भाकित त्यांनी केले होते. गुस्ताव हे कॅटॅलोनियाचे. तीन वर्षे ते भारतात राजदूत होते. ते म्हणाले होते, की कॅटॅलोनिया सधन प्रांत असून, गेले अनेक दशके त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याच्या सधनतेचा लाभ उर्वरित स्पेनला मिळाला, असा तेथील नेत्यांचा दावा असून, स्पेनच्या राजेशाहीपासून या प्रांताला स्वातंत्र्य हवे आहे. जनरल फ्रॅंकोने 1938 साली कॅटॅलोनियाची स्वायत्तता संपुष्टात आणली, तेव्हापासून या प्रांतात असंतोषाचे बीज पेरले गेले. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. स्पेनचे राजे सहावे फिलिप व विद्यमान पंतप्रधान मारिआनो राजॉय त्यांच्या वर्चस्वाला ते थेट आव्हान होय. भाषावादाचीही भर संघर्षात पडली, कारण, स्पेनच्या सर्वोच्च घटनात्मक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, कॅटॅलोनियामध्ये कॅटलोन भाषेला स्पॅनिश भाषेपेक्षा कनिष्ठ मानण्यात आले. तिचे वर्चस्व न्यायालयाने धुडकावून लावले. ती सल कायम आहे. या संदर्भात उपखंडातील उदाहरण म्हणजे, श्रीलंकेतील पूर्व तमिळ बहुभाषी प्रांतात सिंहला भाषेपेक्षा तमिळ भाषेला प्राधान्य मिळावे, यासाठी चाललेला संघर्ष. 

कॅटॅलोनियासंदर्भात युट्यूबवरील माहितीपर व्हिडिओ:

गेल्या महिन्यात (6 सप्टेंबर) कॅटलॉन संसदेने कॅटॅलोनियाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या जनमत कौलाला मान्यता दिली. जनमत कौलात स्वातंत्र्याच्या बाजूने 91.96 टक्के व विरूद्ध केवळ 42.58 असे मतदान झाले. त्यामुळे संघर्ष पेटला. कॅटॅलॉनियाचे सहावे अध्यक्ष व माजी पत्रकार कार्ल्स पुइगडेमॉन्ट यांच्यावर राजे सहावे फिलिप यांनी जोरदार हल्ला चढविला. दरम्यान, बार्सेलोना व अन्य शहरात झालेल्या निदर्शनात सुमारे नऊशे लोक जखमी झाले. स्पेनचे ऐक्‍य धोक्‍यात आल्याने फिलिप व राजॉय यांच्यापुढील संकट आणखी वाढले. मतदानाला थोपविण्यासाठी पोलिसांनी रबर बुलेट्‌सचा वापर केला. त्यामुळे, परिस्थिती आणखी चिघळली. स्पेनमधील अस्थिरता वाढल्यास त्याचे राजकीय परिणाम युरोपीय महासंघावरही होतील. कॅटॅलोनियाच्या स्वातंत्र्याच्या मागणी बरोबरच विघटनवादी बास्क राष्ट्रवादी पक्षाने बंडाचा झेंडा उभारल्यास स्पेनच्या राज्यकर्त्यांपुढे दुहेरी संकट उभे राहील. या पक्षाचे पाच सदस्य स्पेनच्या संसदेत असून, स्पेनचा अर्थसंकल्प संमत करण्यास ते कळीची भूमिका बजावू शकतात. 

कॅटॅलोनियाप्रमाणेच इराकच्या उत्तरेकडील कुर्दिस्तानने अलीकडे स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. 25 सप्टेंबर रोजी झालेला जनमत कौल स्वतंत्र कुर्दीस्तानच्या निर्मितीच्या बाजूने गेला. परिणामतः इराकची वाटचाल विभाजनाच्या दिशेने होणार, हे ही स्पष्ट झाले. इराकमध्ये दाएश (आयसीस) चा प्रभाव जसा वाढत होता, तसे इराकी व अमेरिकन सेना त्यांचा मुकाबला करीत असताना कुर्दिस्तानच्या "पेशमर्गा" सेनेने त्यांना मोठे साह्य केले. आयसीसचा प्रभाव कमी करण्यात त्यांनी कळीची भूमिका बजावली. परंतु, सद्दाम हुसेन यांच्या काळात कुर्दिस्तानच्या जनतेवर असंख्य अत्याचार झाले. सद्दाम हुसेनने त्यांच्याविरूद्ध रासायनिक शस्त्रे वापरली. त्यात सुमारे 50 हजार कुर्दी लोकांचा बळी गेला.

कुर्दिस्तानसंदर्भात युट्यूबवरील माहितीपर व्हिडिओ:

आयसीसविरूद्ध चाललेल्या युद्धादरम्यान सर्वात सुरक्षित शहर होते, ते कुर्दिस्तानची राजधानी इर्बिल. इराकमध्ये अडकून पडलेल्या अनेक भारतीयांना मायदेशी आणण्यात आले, ते इर्बिलमार्गे. लक्षावधी कुर्द (अंदाजे तीस दशलक्ष) इराण, सीरिया व तुर्कस्तानच्या सीमेवरील प्रदेशात राहात असून, स्वतंत्र कुर्दिस्तानच्या कौलाचा आपल्या देशावर विपरीत परिणाम होईल, असे तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप ताईप एर्डोहान व इराणचे अध्यक्ष हसन रोहानी यांना वाटते. यांनी कुर्दिस्तानच्या स्वातंत्र्याला जाहीर विरोध केला आहे. तथापि, कुर्दिस्तानचे अध्यक्ष मसूद बरझानी यांनी स्पष्ट केले आहे, की स्वातंत्र्याला पर्याय नाही. ते म्हणाले, की पहिल्या महायुद्धापासूनच आम्ही इराकचा भाग नव्हतो. आमचा वेगळा भुगोल, जमीन व संस्कृती आहे. "कोणत्याही परिस्थित आम्ही गौणस्थान स्वीकारणार नाही. बगदादमधील संसद ही संघराज्याची संसद नव्हे, तर पूर्णपणे क्षेत्रवादी व द्वेषमूलक संसद आहे," असे बरझानी म्हणतात. त्यांच्या या भूमिकेमुळे बगदादमधील वातावरण तापले असून, इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी कुर्दिस्तानविरूद्ध सैनिकी हस्तक्षेप करण्याचा इशारा दिला आहे. त्यांना तुर्की व इराणने शस्त्रसाह्य केले, तर आधीच अस्थिर असलेल्या या परिसरात एक नवे युध्द सुरू होऊन त्याचा लाभ पराभूत होत चाललेल्या आयसीसला मिळेल व अशांततेची जीवघेणी वाटचाल तशीच पुढे चालू राहील. 

विजय नाईक यांच्या आणखी काही ब्लॉग पोस्ट:

Web Title: Marathi blog Vijay Naik writes about Kurdish Catalonia protests