'SCO'त मतभेदांना स्थान नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

भारताचा "एससीओ'तील प्रवेश हा निश्‍चित महत्त्वपूर्ण असून, भारत-पाकमधील संबंध सुधारण्यासाठी एसीओच्या रुपाने आणखी एक संधी मिळाली आहे.
- विजय गोखले, भारताचे राजदूत

बीजिंग - भारत, पाकिस्तान या दोन्ही देशांचे शांघाय सहकार संघटनेत (एससीओ) स्वागत करतानाच उभय देशांमधील मतभेदांमुळे सामूहिक एकतेला हानी पोचेल, ही शक्‍यता आज चीनने फेटाळून लावली. घोषणापत्राद्वारे दोन्ही देशांतील शत्रुत्व किंवा मतभेद संघटनेत आणण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही चीनने स्पष्ट केले.

"भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश एससीओचे सदस्य होणे, ही बाब संघटनेच्या संस्थापक सदस्य या नात्याने आपल्यासाठी आनंददायक आहे,' असे चीनचे सहायक परराष्ट्रमंत्री कॉंग शुयानयू म्हणाले. उभय देशांच्या एससीओतील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज संघटनेच्या मुख्य कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भारताचे राजदूत विजय गोखले, तसेच पाकिस्तानचे राजदूत मसूद खालिद उपस्थित होते.
संघटनेची स्वतःची कार्यपद्धती असून, काही नियमही आहेत. त्यामुळे या नियमानुसार भारत व पाकिस्तानला आपले द्विपक्षी संबंध व मतभेद संघटनेपासून दूर ठेवावे लागणार आहेत. हे दोन्ही देश या नियमांचे पालन करतील, अशी अपेक्षा आम्हाला आहे, असेही शुयानयू यांनी स्पष्ट केले. सदस्य देशांमधील मतभेद दूर करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश असून, द्विपक्षी संबंध व आपापसातील तणाव संघटनेत येणे हे संघटनेसाठी हानिकारक असल्याचेही ते म्हणाले. कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या संघटनेच्या परिषदेत भारत-पाकिस्तानच्या सदस्यत्वावर शिक्कामोर्तब झाले होते.

'SCO' संघटनेविषयी
चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गीझस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत व पाकिस्तान हे या संघटनेचे सदस्य देश असून, अफगाणिस्तान, बेलारुस, इराण आणि मंगोलिया हे निरीक्षक देश आहेत. या संघटनेचे अध्यक्षपद यंदा चीनकडे आले असून, यापूर्वी ते कझाकिस्तानकडे होते.

Web Title: marathi news bijing news international news sco news