उत्तर कोरियावर दबाव टाका- ट्रम्प यांचे चीनला आवाहन 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

चीनचे जवळचे मित्रराष्ट्र असलेला पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याकडे चीनचे लक्ष वेधत त्यावर कारवाईचा करण्यासाठी पाकवर दबाव आणावा असे आवाहन चीनला करण्यात आले.

बीजिंग- चीनने उत्तर कोरियाशी संबंध कमी करण्याचे व उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमांना लगाम घालण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकावा, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला केले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर बोलताना ट्रम्प यांनी याबाबत सांगितले. उत्तर कोरियाने अमेरिकेविरुद्ध आणखी प्रक्षोभक वक्तव्ये व कृत्ये करू नयेत, असा इशाराही उत्तर कोरियाला ट्रम्प यांनी या दौऱ्याच्या सुरवातीलाच दिला होता. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या चीन दौऱ्यावर आहेत. या तीनदिवसीय दौऱ्यासाठी चीनमध्ये आगमन झाले असता त्यांचे थाटात स्वागत करण्यात आले. येथील ग्रेट हॉलमध्ये पार पडलेला ट्रम्प यांचा स्वागत समारंभ चिनी माध्यमांनी थेट प्रक्षेपित केला. चिनी सैन्यातील तिन्ही दलातील सैनिकांनी ट्रम्प यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन सन्मानित केले. यानंतर ट्रम्प आणि जिनपिंग यांनी एकमेकांच्या प्रतिनिधी मंडळाचा परिचय करून दिला. तसेच ट्रम्प यांनी त्यांचे जावई जरेड कुशनर यांचाही जिनपिंग यांच्याशी परिचय करून दिला.     

उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम आणि चीनला द्विपक्षीय व्यापारात झालेली तूट याविषयी दोन्ही देशाच्या प्रतिनिधी मंडळांमध्ये या भेटीदरम्यान चर्चा पार पडली. आशियातील पाच प्रमुख देशांच्या ट्रम्प यांच्या दौऱ्यातील चीन दौरा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मानले जात आहे. 

उत्तर कोरियाने आपले आण्विक कार्यक्रम थांबवावेत असे ट्रम्प यांनी या दौऱ्यापूर्वी सांगितले होते. दक्षिण आशियासंदर्भात ट्रम्प यांचे धोरणा कठोर आहे. त्यानुसार चीनचे जवळचे मित्रराष्ट्र असलेला पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याकडे चीनचे लक्ष वेधत त्यावर कारवाईचा करण्यासाठी पाकवर दबाव आणावा असे आवाहन चीनला करण्यात आले. या विषयावर या तीनदिवसीय दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांची चीनची राजकीय भेट सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण ठरेल, अशी आशा जिनपिंग यांनी व्यक्त केली आहे. जानेवारी महिन्यात ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून दोन्ही राष्ट्रप्रमुख एकमेकांशी नियमित संपर्कात आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: marathi news donald trump's china visit north korea issue