हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटना- अमेरिकेची घोषणा

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

अमेरिकेच्या या घोषणेमुळे हिजबुलच्या सर्व हालचालींवर आता अनेक निर्बंध येणार आहेत.

वॉशिंग्टन- काश्मीरमधील दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनला अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधातील हे स्पष्ट धोरण म्हणजे पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात आहे.

या आधी दोन महिन्यांपूर्वी या संघटनेचा पाकिस्तानस्थित म्होरक्या सईद सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. आता स्थलांतर आणि राष्ट्रीयत्व कायद्याअंतर्गत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेला 'परदेशी दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केले आहे. 

भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया उघड्या पाडले. यामुळे अमेरिकेच्या या निर्णयामध्ये भारताचे प्रयत्न परिणामकारक ठरल्याचे मानले जात आहे. अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे या संघटनेच्या अमेरिकेतील सर्व संपत्तीवर टाच येणार आहे.

अमेरिकेच्या या घोषणेमुळे हिजबुलच्या सर्व हालचालींवर आता अनेक निर्बंध येणार आहेत. अलीकडच्या काळात काश्मीरमध्ये हिजबुलच्या दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. "या जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश झाल्यामुळे संघटनेला पैसे मिळणाऱ्या स्त्रोतांना अमेरिकेत परवानगी नाकारण्यात येईल," असे अमेरिकन परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: marathi news hizbul mujahideen global terror outfit