आयफोनच्या बॅटरीचा स्फोट ; एक जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जानेवारी 2018

जखमी झालेली व्यक्ती मोबाईल दुरुस्तीचे काम करत होती. त्यादरम्यान बॅटरी अचानकपणे जास्त तापल्याने तिचा स्फोट झाला.

ज्युरीख : आयफोनची बॅटरी अचानकपणे जास्त प्रमाणात तापल्याने अॅपलच्या स्टोअरमध्ये स्फोट झाला. या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाला असून, स्टोअरमधील इतर लोकांना बाहेर काढण्यात आले. 

याबाबतची माहिती येथील एका संकेतस्थळाने दिली. ही घटना ज्युरिख येथे घडली. जखमी झालेली व्यक्ती मोबाईल दुरुस्तीचे काम करत होती. त्यादरम्यान बॅटरी अचानकपणे जास्त तापल्याने तिचा स्फोट झाला. याबाबत ज्युरिख शहर पोलिसांनी सांगितले, की मोबाईल फोनचा अचानकपणे स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती मिळू शकली नाही. या स्फोटानंतर यातील जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले. या कर्मचाऱ्याचा हात थोडा भाजला आहे. तसेच इतर सात जणांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

ही घटना घडली, तेव्हा 50 पेक्षा अधिक लोक स्टोअरमध्ये उपस्थित होते. या सर्वांना सुखरुप दुकानाबाहेर काढण्यात आले. 

दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे झाली. याबाबतचा तपास न्यायवैद्यक (फॉरेंन्सिक) प्रयोगशाळेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला जाणार आहे. मात्र, अॅपलकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international news iPhone Battery Explodes At Zurich Apple Store One Injured

टॅग्स