नवाज शरीफ यांची हकालपट्टी कायमची की तात्पुरती? 

वृत्तसंस्था
रविवार, 30 जुलै 2017

माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना 2012 मध्ये न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कलम-63 अन्वये अपात्र ठरविण्यात आले होते. ही कारवाई पाच वर्षांसाठी होती. मात्र, दुर्देवाने 'कलम 62(1) एफ'नुसार कारवाई करताना अपात्रतेचा कालावधी निश्‍चितपणे सांगण्यात आलेला नाही
- राहिल कामरान शेख, ज्येष्ठ वकील 

इस्लामाबाद : 'पनामा पेपर्स'शी संबंधित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना कोणतेही सार्वजनिक पद भूषविण्यास अपात्र ठरविले असून, त्यांच्यावर झालेली ही कारवाई तात्पुरती आहे की काही कालावधीनंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय होणार, असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. 

या प्रश्नाबाबत न्यायालयाच्या निकालातून स्पष्टपणे उलगडा होताना दिसत नाही. पाकमधील काही मातब्बर वकिलांना या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर संमिश्र उत्तरे मिळाली आहेत. काहीजण याविषयी संभ्रमात असून, काहींनी असे प्रश्न न्यायालयासमोर दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत किंवा त्यांचा विसर पडल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या प्रश्नावर विचार होण्याची गरजही काहींनी नमूद केली आहे. 

शरीफ यांच्यावर दंडसंहिता 'कलम 62(1) एफ'नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अशी कारवाई तात्पुरती असते की कायमस्वरूपी, असे प्रश्न याच्याशी साध्यर्म असलेल्या अन्य खटल्यांच्या निकालानंतर उपस्थित झाले असून, त्यावर सर्वोच्च न्यायालयात विचार सुरू आहे. समीना खावर हयात आणि मोहंमद हनीफ यांच्याशी संबंधित खटल्याचाही त्यात समावेश असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तारीक मेहमूद यांनी 'डॉन' या दैनिकाशी बोलताना दिली. 

Web Title: marathi news international news pakistan news nawaz sharif Panama Papers