काझुओ इशिगुरो यांना साहित्याचे नोबेल

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

तुमच्या अगदी अमुल्य अशा स्मृतीही आश्चर्यकारकरित्या पटकन विस्मृतीत जातात. पण, मी या गृहितकानं जात नाही. ज्या स्मृती कधीही विस्मृतीत जात नाहीत; अशा स्मृती कथानकासाठी मी निवडतो.
- काझुओ इशिगुरो, नेव्हर लेट मी गो (2005)

जपानी वंशाचे इंग्रजी लेखक काझुओ इशिगुरो यांना 2017 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे. नोबेल पुरस्कार समितीने आज (गुरूवार) इशिगुरो यांच्या नावाची घोषणा केली. 

लघुकथा, कादंबऱया, चित्रपट-टीव्ही मालिकांसाठी पटकथा अशी बहुप्रवसा लेखणी लाभलेले इशिगुरो 1982 पासून पूर्णवेळ लेखक आहेत. ए पेल व्ह्यू ऑफ हिल्स या पहिल्या कांदबरीने इशिगुरो यांनी साहित्यप्रेमींचे लक्ष वेधले. इंग्लंडमध्ये एकटी राहणाऱया इट्स्युको या जपानी महिलेभोवती त्यांची पहिली कांदबरी फिरते.

तुमच्या अगदी अमुल्य अशा स्मृतीही आश्चर्यकारकरित्या पटकन विस्मृतीत जातात. पण, मी या गृहितकानं जात नाही. ज्या स्मृती कधीही विस्मृतीत जात नाहीत; अशा स्मृती कथानकासाठी मी निवडतो.
- काझुओ इशिगुरो, नेव्हर लेट मी गो (2005)

इशिगुरो जन्माने जपानमधील नागासाकीचे. स्वाभाविकपणे पहिल्या कादंबरीसाठी नागासाकीचा पट निवडला. या कांदबरीच्या यशानंतर इशिगुरो यांनी मागे वळून पाहिले नाही. अमेरिकेच्या अणुबॉम्ब हल्ल्यात उद््धवस्त झालेल्या नागासाकीची पार्श्वभूमी त्यांनी 1986 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अॅन आर्टिस्ट ऑफ द प्लोटिंग वर्ल्ड या दुसऱया कांदबरीमध्येही निवडली. दुसऱया महायुद्धानंतरच्या नागासाकीचे चित्रण या कादंबरीत आहे. 

इशिगुरो यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1954 चा. त्यांचे वय पाच वर्षे असताना कुटुंबाने ब्रिटनमध्ये स्थलांतर केले. त्यानंतर खूप वर्षांनी इशिगुरो यांनी मातृभुमीचे दर्शन घेतले. युनिव्हर्सिटी ऑफ केंटमधून इंग्रजी आणि तत्वज्ञानाचे पदवीचे शिक्षण घेतलेल्या इशिगुरो यांनी साहित्य निर्मिती करताना 'स्मृतींमध्ये, काळाच्या पटामध्ये आणि काहीसे आत्मभ्रम जपणारे असे वर्तमानातील विषय निवडले,' असे नोबेल समितीने आवर्जून नमूद केले आहे.

अलिकडच्या काळात, 2015 मध्ये प्रसिद्ध झालेल्या द बरीड् जायंट या कादंबरीसाठी इशिगुरो यांनी ब्रिटनमधला पट निवडताना एका वृद्ध दाम्पत्याची कथा मांडली आहे. आपल्या प्रौढ मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या कथेच्या माध्यमातून त्यांनी स्मृती, विस्मृती आणि इतिहासाचा वर्तमानातील संबंध अशी मानवी आयुष्यातील विविध धागे गुंफणारी अप्रतिम साहित्य निर्मिती केली. 

इशिगुरो यांची इंग्रजी साहित्य संपदा

 • 1982: ए पेल व्ह्यू ऑफ हिल्स
 • 1986: अॅन आर्टिस्ट ऑफ द प्लोटिंग वर्ल्ड
 • 1989: द रिमेन्स ऑफ द डे
 • 1995: द अनकन्सोल्ड
 • 2000: व्हेन वुई वेअर ऑर्फन्स
 • 2005: नेव्हर लेट मी गो
 • 2009: नॉक्टर्नस्: फाईव्ह स्टोरीज ऑफ म्युझिक अँड नाईटफॉल
 • 2015: द बरीड् जायंट

साहित्यातील नोबेल...

 • 110 जणांना आजअखेर साहित्यातील नोबेल मिळाले आहे. 
 • 14 महिलांचा यामध्ये समावेश आहे. 
 • 4 वेळा नोबेल दोन साहित्यिकांना विभागून देण्यात आले आहे. 
 • 41 व्या वर्षी नोबेल मिळविणारे रुडयार्ड किपलिंग सर्वात तरूण पुरस्कार विजेते होते. 
 • 88 व्या वर्षी डोरीस लॉरेटस् यांना पुरस्कार मिळाला होता. ते सर्वात वृद्ध विजेते ठरले होते. 
 • 65 व्या वर्षी सर्वसाधारणपणे साहित्यिकांना नोबेल मिळाले आहे.
Web Title: Marathi news latest news in Marathi Nobel Prize in literature 2017