सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशच पक्षपाती : नवाज शरीफ

पीटीआय
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दुहेरी मापदंड वापरत असल्याचा गंभीर आरोप माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज केला. विरोधी पक्ष असलेल्या 'तेहरीके इन्साफ'चे अध्यक्ष असलेल्या इम्रान खान यांच्याविरोधातील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी वेळोवेळी मवाळ भूमिका घेतली असल्याचा दावा शरीफ यांनी केला. 

'पनामा पेपर्स' प्रकरणात नाव आल्यानंतर शरीफ यांच्याविरोधात पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी तीन खटले सुरू असून, न्यायालयाने अपात्र ठरविल्यानंतर शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते. आपल्या विरोधातील तीन वेगवेळ्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणीही शरीफ यांनी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांची ही मागणी फेटाळून लावली होती. या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांवरच टीकेची तोफ डागली आहे. 

भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी शरीफ आज न्यायालयात हजर होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना शरीफ म्हणाले, की बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आरोप झाल्यानंतर पंतप्रधानांना तातडीने अपात्र रविण्यात आले; मात्र असाच न्याय विरोधी पक्षाचे नेते असलेल्या इम्रान खान यांच्याबाबत झाला नाही. खान यांनी यासंदर्भात कबुली दिली असूनही त्यानंतर न्यायालयाने कुठलीही कारवाई त्यांच्याविरोधात केलेली नाही. 

शरीफ म्हणाले, की बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी इम्रान खान यांनी दिलेल्या कबुलीचा व्हिडिओ उपलब्ध आहे. असे असले तरी त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही. पाकिस्तानात कायद्याचे राज्य असून, अशा प्रकारे न्यायाधीश दुहेरी मापदंड वापरू शकत नाहीत. न्यायाची पुनर्स्थापना करण्यासाठी गरज पडल्यास मोठी मोहीम सुरू करण्याचा इशाराही शरीफ यांनी या वेळी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites Pakistan News Nawaz Sharif Imran Khan Supreme Court