अफगाणच्या महिला सैन्याला प्रथमच लष्कराकडून प्रशिक्षण

वृत्तसंस्था
बुधवार, 6 डिसेंबर 2017

लष्करामध्ये 10 टक्क्यांपर्यंत महिलांचा सहभाग वाढावा, असे ध्येय अफगाण लष्कराचे असून, त्यादृष्टीने लष्कराकडून पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महिलांना भारतात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे.

चेन्नई : आत्तापर्यंत भारतीय लष्कराकडून अनेकांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र, आता पहिल्यांदाच अफगाणच्या महिला सैन्याला भारतीय लष्कराकडून लष्करी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी अफगाण महिला सैन्य भारतातील ऑफिसर प्रशिक्षण अकादमीत येणार आहेत. 

या सर्व अफगाण महिला अधिकाऱ्यांची विविध पदांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांना प्रशिक्षणासाठी भारतात जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार अफगाण महिला सैन्य भारतात येणार आहे. त्यांच्या टीममध्ये 17 महिला अधिकाऱ्यांचा समावेश असून, यामध्ये हवाई दलाचे 3 आणि काही विशेष दलाचे तर काही गुप्तचर यंत्रणांच्या महिला अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. 

शारीरिक प्रशिक्षण देणे, संभाषण कौशल्य आणि नेतृत्व कसे असावे, हा या प्रशिक्षणाचा हेतू असणार आहे, असे भारताचे अफगाणिस्तानमधील राजदूत मनप्रीत वोहरा यांनी सांगितले. 

यापूर्वी भारतीय लष्कराने अफगाणच्या लष्करातील 4000 सैनिक आणि पोलिसांना प्रशिक्षण दिले होते. पण अफगाणच्या महिला अधिकाऱ्यांना अशाप्रकारे प्रशिक्षण देणे, ही देशातील पहिलीच वेळ आहे.  

लष्करामध्ये 10 टक्क्यांपर्यंत महिलांचा सहभाग वाढावा, असे ध्येय अफगाण लष्कराचे असून, त्यादृष्टीने लष्कराकडून पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महिलांना भारतात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national In A First Indian Army To Train Afghan Women Military Personnel