दक्षिण कोरियात मराठी शात्रज्ञ करतोय 'बायो सेन्सर कीट'वर संशोधन

विश्वासाठी असेल नवीन उपलब्धी, मृदा परिक्षणातही होणार मदत, परभणीचे शास्त्रज्ञ डॉ. कदम यांच्यावर धुरा
research
researchresearch

-जितेंद्र विसपुते

औरंगाबाद: दैनंदिन आहारातील भाजीपाला, फळे, आदी खाद्यपदार्थांतील मानवी शरीराला हानिकारक घटकांची (द्रव्ये, रसायने) प्रमाणमात्रा, त्यातील भेसळ ओळखण्यासाठी अद्याप आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणतेही सहज आणि स्वस्त तंत्रज्ञान उपलब्ध नाही. सर्वसामान्यांसाठी अशी सुरक्षा कीट उपलब्ध व्हावी यासाठी दक्षिण कोरियाने ‘बायोसेन्सर कीट’वर ग्लोबल रिसर्च सुरु केला आहे. ही कीट डीएनए ऐप्टामरचा (जैवतंत्रज्ञान) वापर करून विकसित केली जात आहे. विशेष म्हणजे या संशोधनाची धुरा मराठी शास्त्रज्ञ वरिष्ठ संशोधक डॉ. उल्हास सोपानराव कदम (पोखर्णी देवी, ता.पालम, जि. परभणी) यांच्यावर आहे.

खाद्यपदार्थांत भेसळ होते. भाजीपाला, फळे पिकविण्यासाठी अमाप हानिकारक रसायने वापरली जातात. ज्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. ही भेसळ आणि हानिकारक रसायन द्रव्यांचे प्रमाण ओळखण्यासाठी दक्षिण कोरियाने, ग्येओंगसँग राष्ट्रीय विद्यापीठाच्या (जिंजू) अंतर्गत तीन महिन्यांपासून संशोधन सुरु केले आहे. जगातील काही मोजक्याच देशांत यावर संशोधन सुरु आहे. सन २०२३ पर्यंत हे संशोधन पूर्ण होऊन जागतिक बाजारपेठेत बायोसेन्सर कीट उपलब्ध होईल. आपल्या या संशोधनाचा भारतालाही मोठा फायदा होईल असेही डॉ. उल्हास कदम यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले. प्रत्येक घटकानिहाय (उदा. दूध, मध, पाणी, हळद, भाजीपाला, फळे, मांस, विविध धान्यांचे पीठ, रसायने, ज्यूस आदी.) स्वतंत्र अशी ही कीट असणार आहे. याची किंमतही सर्वसामान्यांना परवडणारी असणार आहे. बायोसेन्सर किटचा वापर मृदा परिक्षण कार्यातही करता येणार असल्याचे डॉ.कदम यांनी सांगितले.

research
उस्मानाबादच्या 'MH 25' च्या युवकांकडून पूरग्रस्तांना मदत

डॉ. कदम यांच्याबद्दल-

शास्त्रज्ञ डॉ.कदम यांनी जर्मनी आणि अमेरिकेत संशोधने केली आहेत. डॉ. कदम यांचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे झाले. सन २००८ मध्ये त्यांनी अमेरिका गाठली. येथे त्यांनी पर्ड्यू विद्यापीठातून बायोलॉजिकल इंजिनिअरिंग या विषयात पीएच.डीचे शिक्षण पूर्ण केले. येथूनच त्यांच्या कर्तृत्वाला जागतिक झळाळी मिळाली. भारतासाठी तुरीवरील PPSMV या विषाणूवर संशोधन केले आहे. २०१८ मध्ये जर्मनीची हम्बोल्ड फेलोशिपही मिळाली आहे.

जर्मनीसह अमेरिकेत पेटंटसाठी प्रस्ताव-

डॉ. कदम यांनी ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी येथील संशोधकांच्या सहकार्याने २०१८ ते २०२० या काळात आरएनए इंटरफेअरन्स हे संशोधन केले आहे. विविध दुर्धर आजारावरील उपचारात या संशोधनाचा फायदा होणार आहे. या संशोधनाचे पेटंट मिळावे यासाठी त्यांनी जर्मनी व अमेरिकेत प्रस्ताव दाखल केला आहे. तर भविष्यात हवेतील प्रदूषणाची मात्रा ओळखणारी कीट देखील तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

research
हरवले मंगळसूत्र; सापडले ‘मंगल’सूत्र!

जैवतंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला, फळे व इतर खाद्यपदार्थांचा दर्जा उत्कृष्ट असा कसा करता येईल हे माझे लक्ष्य आहे. खाद्यपदार्थांत होणारी भेसळ ओळखण्यासाठी जागतिक बाजारात स्वस्त आणि सहज असलेली कीट अथवा उपकरणे उपलब्ध नाहीत. शिवाय हानिकारक रसायने निसर्गात जाऊन त्याचे विपरीत परिणाम होतात. नवीन संशोधन करून हे दुष्परिणाम रोखण्याबाबत काम सुरू आहे. बायोसेन्सर किटचे संशोधन अवघ्या विश्वासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे असेल.

-डॉ. उल्हास कदम, शास्त्रज्ञ, ग्येओंगसँग राष्ट्रीय विद्यापीठ, दक्षिण कोरिया

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि मानवी अन्नला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी घातक रसायनांविरूद्ध नवीन बायोसेन्सर विकसित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या ग्रहावरील प्रत्येक जीवाच्या सुरक्षेसाठी आम्ही हे संशोधन करीत आहोत. हे संशोधन आमच्या सामान्य हितसंबंधांना बळकट करेल. शिवाय भारताशी देखील आमचे दृढ संबंध निर्माण करेल. ही बायोसेन्सर कीट सामान्य लोकांच्या वापरासाठी उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमचा विश्वास आहे की या प्रयत्नांचा शेतकरी आणि ग्राहकांना तितकाच फायदा होईल.

-प्रो.जॉन्ग चॅन हॉंग, संचालक, पीएमबीबीआरसी, ग्येओंगसँग राष्ट्रीय विद्यापीठ, दक्षिण कोरिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com