झुकेरबर्ग यांच्याकडून पुन्हा एकदा माफीनामा 

वृत्तसंस्था
Wednesday, 11 April 2018

झुकेरबर्ग यांनी कॉंग्रेससमोर हजर राहण्यापूर्वी लेखी माफीनामा प्रसिद्ध केला. "फेसबुक' यूजर्सची माहिती ब्रिटनमधील केम्ब्रिज ऍनालिटिका या सल्लागार कंपनीने अनधिकृतरीत्या वापरल्याबद्दल झुकेरबर्ग यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

वॉशिंग्टन : "फेसबुक'च्या 8.70 कोटी यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारून "फेसबुक'चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी आज अमेरिकी कॉंग्रेसची माफी मागितली. यूजर्सची माहिती गोपनीय ठेवण्यासाठी योग्य काळजी घेतली नसल्याचे झुकेरबर्ग यांनी आज पुन्हा एकदा मान्य केले. 

झुकेरबर्ग यांनी कॉंग्रेससमोर हजर राहण्यापूर्वी लेखी माफीनामा प्रसिद्ध केला. "फेसबुक' यूजर्सची माहिती ब्रिटनमधील केम्ब्रिज ऍनालिटिका या सल्लागार कंपनीने अनधिकृतरीत्या वापरल्याबद्दल झुकेरबर्ग यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

"आम्ही आमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडू शकलो नाही. ही आमची फार मोठी चूक आहे. मी "फेसबुक' सुरू केले असल्याने येथे जे काही घडले, त्याची जबाबदारी माझ्यावरच आहे. "फेसबुक'चा वापर इतरांना त्रास देण्याकरिता, विदेशांमधील निवडणुकीत हस्तक्षेप करण्याकरिता आणि वादग्रस्त विधाने करण्याकरिता केला गेला. हे रोखण्यात आम्ही अपयशी ठरलो,' असे झुकेरबर्गने माफीनाम्यात म्हटले आहे. 

या घटनेबद्दल काही दिवसांपूर्वीही माफी मागितलेल्या झुकेरबर्ग यांनी पुन्हा एकदा कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी देण्याची विनंती केली आहे. माणसे एकमेकांना जोडणे, समाज एकसंध राखणे आणि जगाला जवळ आणणे हेच "फेसबुक'चे उद्दिष्ट असून, जाहिराती मिळविणे हे कधीही प्राथमिक उद्दिष्ट असणार नाही, असेही झुकेरबर्ग यांनी आश्‍वासन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mark Zuckerberg publicly apologized for his company’s errors