मार्क झुकरबर्ग यांनी मागितली माफी, म्हणाले 'पोस्ट हटवायला हवी होती'

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 30 August 2020

सोशल मीडिया साईट फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्टप्रकरणी माफी मागितली आहे.

वॉशिंग्टन- सोशल मीडिया साईट फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्टप्रकरणी माफी मागितली आहे. पोलिसांकडून कृष्णवर्णीय व्यक्ती जॅकब ब्लॅक यांना गोळी मारण्यात आली होती. यानंतर उसळलेल्या हिंसेदरम्यान नागरिकांना शस्त्रांसोबत केनोशामध्ये प्रवेश करण्याचे आव्हान करणारी एक फेसबुक पोस्ट मिलिशिया समुहाच्या पेजवर करण्यात आली होती. मात्र, ही पोस्ट न हटवून फेसबुकने मोठी चूक केली होती. त्यामुळे हिंसेला हातभार लागला होता. 

तीबेट भोवती अभेद्य भींत उभारणार; शी जिनपिंग यांचे सूतोवाच

कृष्णवर्णीय व्यक्ती जॅकब ब्लॅक यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर केनोशा शहरात मोठी हिंसा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. केनोशामध्ये झालेल्या हिंसेत दोन नागरिकांची हत्या करण्यात आली होती, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पुढच्या दिवशी फेसबुकने आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकली होती.  याप्रकरणी झुकरबर्ग यांनी एका व्हिडिओद्वारे माफी मागितली आहे. ती पोस्ट तात्काळ काढून टाकणं गरजेचं होतं, पण ती एक ऑपरेशनल चूक होती, असं ते म्हणाले आहेत. 

अनेक लोकांनी या पोस्टबाबत आपत्ती घेतली होती. ज्या अधिकाऱ्यांकडून फेसबुकच्या नियमांचे उल्लघंन झाले आहे, अशांवर कारवाई केली जाईल, असं झुकरबर्ग म्हणाले.

दरम्यान, मागील आठवड्यात पोलिसांनी निशस्त्र कृष्णवर्णीय नागरिक जॅकब ब्लॅक यांच्यावर गोळीबार केला होता. यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या शरीराचा एक भाग पूर्णपणे निकामी झाला आहे. या घटनेनंतर केनोशा शहरात दंगली उसळल्या होत्या. आंदोलकांनी ब्लॅक यांना न्याय मिळावा अशी मागणी केली होती. या घटनेने अमेरिकेतील वातावरण चांगलेच तापलं होतं. 

चक्क आरोग्य मंत्र्यांनी स्वच्छ केलं कोविड रुग्णालयातील शौचालय! (Video)

गुरुवारी, 'केनोशा गार्ड' नावाच्या एका फेसबुक पेजने हातात शस्त्र घेण्याचे आवाहन केले होते. शत्रूंपासून आपल्या शहराला वाचवा असा मजकूर पोस्टमध्ये लिहिण्यात आला होता. या पोस्टनंतर जवळपास ३००० लोकांनी यामध्ये रस दाखवला होता. त्यानंतर झालेल्या हिंसेत एका १७ वर्षाच्या मुलाने तीन कृष्णवर्णीय नागरिकांना गोळ्या घातल्या होत्या. यात दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. या हिंसेनंतर फेसबुकने पेज आणि ती पोस्ट काढून टाकली आहे. 

दरम्यान, झुकरबर्ग यांनी व्हिडिओ पोस्ट करत झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली आहे. गोळीबार केलेला अल्पवयीन मुलगा या पेजला फॉलो करत होता याचे काही पुरावे मिळाले नाहीत. असे असले तरी  'केनोशा गार्ड' पेजने फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या पेसच्या सर्व संबंधितांवर कारवाई केली जात आहे, असं ते म्हणाले.

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mark Zuckerberg Says Facebook Decision to Not Take Down Page Was a Mistake