सॅम्युअल्सची पाक सैन्यात सहभागी होण्याची इच्छा

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

जनरल मी तुम्हाला सॅल्युट करतो. माझ्या खांद्यावर पाकिस्तानी सैन्याचा बॅच लागण्याची मी प्रतीक्षा करत आहे. मला पाकिस्तानी सैन्याचा एक भाग बनायचा आहे. माझ्या मृत्यूपर्यंत मी या देशात येत राहणार.

लाहोर - वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्लोन सॅम्युअल्स याने पाकिस्तानी सैन्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) अंतिम सामना खेळण्यासाठी लाहोरमध्ये आल्यानंतर सॅम्युअल्सने ही इच्छा व्यक्त केली. पीएसएलमध्ये मार्लन सॅम्युअल्स पेशावर जाल्मी संघाचे प्रतिनिधत्व केले. याच संघाला पीएसएलचे विजेतेपद मिळाले. या संघाचे मालक जावेद आफ्रिदी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट टाकत सॅम्युअल्सने पाकिस्तानी सैन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे तोंडभरुन कौतुक केल्याचे म्हटले आहे.

पेशावर जाल्मी संघाने पीएसएलचे विजेतेपद मिळविल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी संघाची भेट घेतली. पाकिस्तान लष्करप्रमुखांशी भेट झाल्यानंतर सॅम्युअल्सने ही इच्छा व्यक्त केली आहे.

सॅम्युअल्सने म्हटले आहे, की पाकिस्तानमध्ये येऊन क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. इथे जे लोक मागील काही काळापासून क्रिकेट पाहू शकत नव्हते, त्यांच्या उदार चेहऱ्यावर या सामन्यामुळे आनंद पाहायला मिळाला. मी मनाने, हृदयाने पाकिस्तानी आहे. यामुळे पाकिस्तानात येण्याबाबत निर्णय घेण्यास फार वेळ लागला नाही. जनरल मी तुम्हाला सॅल्युट करतो. माझ्या खांद्यावर पाकिस्तानी सैन्याचा बॅच लागण्याची मी प्रतीक्षा करत आहे. मला पाकिस्तानी सैन्याचा एक भाग बनायचा आहे. माझ्या मृत्यूपर्यंत मी या देशात येत राहणार.

Web Title: Marlon Samuels Eager To Join Pakistan Army, Says He Is Pakistani At Heart