प्रसारमाध्यमांनी तोंडे बंद ठेवावीत

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

वॉशिंग्टन- मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे अमेरिकेतील नव्या ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात असल्याचा आरोप करत सर्व प्रसारमाध्यमांनी आता आपली तोंडे बंद ठेवावीत, अशा तिखट शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागाराने प्रसारमाध्यमांवर तोंडसुख घेतले. ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड झाल्यापासून अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे-पत्रकार आणि ट्रम्प यांच्यात शाब्दिक सामना रंगला असून, अद्यापही तो थांबण्याची चिन्हे नाहीत.

अध्यक्ष ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागारांपैकी एक आणि "व्हाइट हाउस'चे मुख्य धोरण सल्लागार स्टिफन बॅनन यांनी आज प्रसारमाध्यमांवर अतिशय खालच्या पातळीवरील आरोप करत नव्या वादाला तोंड फोडले. ""अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी प्राप्त केलेला दणदणीत विजय हा मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांना लगावलेली सणसणीत चपराक आहे. ट्रम्प यांचा विजय प्रसारमाध्यमांसाठी लज्जास्पद आणि अपमानित करणारा ठरला आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आता आपली तोंडे बंद ठेवून, सध्या फक्त ऐकण्याचे काम करावे,'' अशा शब्दांत बॅनन यांनी सडकून टीका केली.

एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत बॅनन यांनी म्हटले आहे, की अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्ष नव्हे, तर मुख्य प्रावाहातील प्रसारमाध्यमे विरोधी पक्षाचे काम करत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर प्रसारमाध्यमे तोंडावर पडली आहेत. प्रसारमाध्यमे शंभर टक्के चुकीची ठरली आहेत. प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शून्य झाली आहे. "द न्यूयॉर्क टाइम्स'सारखे वर्तमानपत्रही चुकीचे ठरले आहे.

बॅनन यांच्या नव्या टीकेमुळे अमेरिकेतील प्रसारमाध्यमे आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील वाद वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कोण आहेत स्टिफन बॅनन?
पुराणमतवादी आणि कट्टर उजव्या विचारांचे समर्थन करणाऱ्या ब्रेटबार्ट या न्यूजपोर्टलचे बॅनन हे कार्यकारी संपादक होते. या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रमुखपद सांभाळले. ट्रम्प यांना विजयी करण्यात मोठी भूमिका बजावलेले बॅनन हे उजव्या विचारसरणीचे कट्टर समर्थन करणारे पत्रकार आहेत. प्रचार मोहिमेच्या काळात ट्रम्प यांना लाभ होईल असे वार्तांकन करण्यासाठी ब्रेटबार्ट या न्यूजपोर्टलला मोठ्या प्रमाणात पैसे पुरविण्यात आले होते, असा आरोप करण्यात येतो. बॅनन हे सध्या ट्रम्प यांचे जवळचे सल्लागार मानले जातात.

Web Title: The media to put off their faces