esakal | अमेरिकेत लस घेण्यात टाळाटाळ; नवरुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

अमेरिकेत लस घेण्यात टाळाटाळ; नवरुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

न्यूयॉर्क : लस घेण्यासाठी सरकारकडून आग्रह होत असतानाही अमेरिकी नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे गेल्या दोन आठवड्यांमध्ये नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून ताण रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. लशीबाबत गैरसमज पसरत असल्याने धर्मगुरुंचीही लसीकरण मोहिमेत मदत घेतली जात आहे.

हेही वाचा: पूरस्थितीमुळं कोकण रेल्वे विस्कळीत; ६,००० प्रवाशी अडकले!

अमेरिकेत आतापर्यंत फक्त ५६.२ टक्के नागरिकांनी लशीचा किमान एक डोस घेतला आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा प्रसार वाढत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी सरकारकडून लसीकरणाचा आग्रह केला जात असताना नागरिक मात्र दुर्लक्ष करत आहेत. लशीबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज पसरले असल्याचा हा परिणाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘लस घेतली नाही तरी चालण्यासारखे आहे, इतकेच नाही तर तसे बायबलमध्येही सांगितले आहे,’ अशाप्रकारची माहिती पसरत असून काही लोक त्यावर विश्‍वासही ठेवत आहेत. त्यांच्यातील हा गैरसमज दूर व्हावा यासाठी सरकारने आता काही राज्यांमध्ये चर्चच्या मदतीने चर्चच्या आवारातच लसीकरण केंद्र सुरु केली आहेत. जवळपास २०० चर्चप्रमुखांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत सर्व ख्रिश्‍चनांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. प्रोटेस्टंट पंथातील नागरिकांचा लसीकरणाला अधिक विरोध आहे.

हेही वाचा: 'गारवा' हॉटेल मालकाची हत्येची 'सुपारी'; कटाचा उलगडा

लसीकरण कमी असल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालये आणि डॉक्टरांवरील ताण वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने डॉक्टरांना इतर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास वेळ कमी पडत आहे. अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागत आहेत. नागरिकांच्या या वर्तणुकीमुळे डॉक्टर हताश झाल्याचे दिसत आहेत. न्यूयॉर्क शहरात एप्रिल महिन्यात दिवसाला एक लाख डोस दिले जात होते. पण आता दिवसाला केवळ १८ हजारच डोस दिले जात आहेत.

लोकांवर भीतीचा फार प्रभाव आहे. जे प्राचीन ग्रंथांच्या बाहेरचे आहे, त्यावर विश्‍वास ठेवताना त्यांना भीती वाटत आहे. ते राजकीय पक्षावर विश्‍वास ठेवतील, पण विज्ञानावर नाही. माझा देवावर विश्‍वास आहे, विज्ञानावर नाही, असे काही लोक म्हणत आहेत. पण, तुम्हाला दोघांमधून एकाची निवड करायची नाही तर दोन्हीही आवश्‍यक आहेत.

- जेरेमी जॉन्सन, धर्मगुरु, मिसौरी

लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. तुम्ही लस घेतली असेल तर तुम्हाला काहीही धोका नाही. सर्व अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व अमेरिकी नागरिकांनी लस घेणे आवश्‍यक आहे.

- ज्यो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका

loading image