मोर्सी, बदेई यांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द

पीटीआय
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

कैरो - इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहंमद मोर्सी आणि मुस्लिम ब्रदरहूडचे सर्वोच्च नेते मोहम्मद बदेई यांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा अपिलीय न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. 

कैरो - इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहंमद मोर्सी आणि मुस्लिम ब्रदरहूडचे सर्वोच्च नेते मोहम्मद बदेई यांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा अपिलीय न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. 

देशात झालेल्या २०११ मधील उठावादरम्यान तुरुंग फोडून मोठ्या प्रमाणात कैदी पळाल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. अपिलीय न्यायालयाने अन्य २१ जणांची जन्मठेपेची शिक्षाही रद्द केली आहे. बदेई यांच्यासह पाच जणांनी मृत्युदंडाच्या शिक्षेला आव्हान दिले होते. त्यांच्यावरील खटल्याची पुन्हा सुनावणी होणार आहे. मोर्सी आणि ब्रदरहूडच्या नेत्यांना जून २०१५ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. वादी अल-नत्रून हा तुरुंग फोडून कैदी पळाले होते. 

याप्रकरणी तुरुंगाच्या इमारतीला आग लावणे, खून करणे, शस्त्रे लुटणे आणि कैद्यांना पलायनास मदत करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात 
आले होते.  मोर्सी यांना अन्य दोन खटल्यांत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इराण, लेबनॉनमधील दहशतवादी गट हिज्बुल्ला आणि पॅलेस्टाईनमधील हमाससाठी हेरगिरी केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. तसेच, राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित कागदपत्रे चोरून कतारला दिल्याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत.

Web Title: morsi & badie the death penalty was canceled