बुलेट ट्रेनचं काय करायचं? मोदी-शिंझो अॅबे यांच्यात चर्चा!

Narendra Modi and Shinzo Abe
Narendra Modi and Shinzo Abe

ओसाका : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची काल (गुरुवार) भेट झाली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांत जागतिक अर्थव्यवस्था, बुलेट ट्रेन, कन्वेंशन सेंटर यांसह विविध मुद्‌द्‌यावर चर्चा झाली. या वेळी मोदींनी शानदार स्वागत सोहळ्याबद्धल शिंजो अबे यांचे आभार मानले, तसेच जी-20 चे अध्यक्षाच्या रूपाने जपानच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. 

जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे जपान दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिलाच जपान दौरा आहे. या वेळी भारतीय शिष्टमंडळाचे जपानकडून जोरदार स्वागत झाले. जी-20 शिखर संमेलन सुरू होण्यापूर्वी मोदी यांची जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी विविध मुद्‌द्‌यावर चर्चा केली. या भेटीसंदर्भात परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी माहिती दिली. दोघे जुने मित्र असल्यामुळे भेटीत सकारात्मक दृष्टीने चर्चा झाल्याचे ते म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्था, आपत्कालीन व्यवस्था, तसेच परांगदा होणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांचे वाढते प्रस्थ यावर चर्चा झाली.

या व्यतिरिक्त मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसी येथे कन्वेंशन सेंटर उभारण्याबाबत चर्चा झाली. बुलेट ट्रेनचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत दोन्ही देश प्रयत्नशील राहणार असल्याचे नमूद केले. या वेळी द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीचाही आढावा घेतला. आर्थिक फसवणूक करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासंदर्भात मोदींनी मांडलेल्या मुद्‌द्‌याचा उल्लेख शिंजो अबे यांनी केला. यास अनुसरून जी-20 च्या देशांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी अशा प्रकारच्या समस्यांचा सामूहिक मुकाबला करायला हवा, अशी भूमिका अबे यांनी मांडली. 

शिंजो अबे भारतात येणार 
या वर्षाखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक परिषदेसाठी पंतप्रधान अबे यांना निमंत्रण दिले असून, या भेटीवरून भारत उत्सुक असल्याचे मोदी म्हणाले. तसेच, ऑक्‍टोबरमध्ये जपानचे सम्राट नारुहितो यांच्या राज्यरोहणप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मोदी-अबे यांची शुक्रवारी एका त्रिपक्षीय बैठकीतही भेट होणार आहे. यात जपान, भारतबरोबरच अमेरिकादेखील सहभागी होणार आहे. अबेव्यतिरिक्त मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनिपिंग, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासह अन्य देशाच्या नेत्यांशी भेटणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com