Chandrayaan 2 : भारतीय तर होतेच, आता 'नासा'ही पडलं 'इस्रो'च्या प्रेमात!

वृत्तसंस्था
रविवार, 8 सप्टेंबर 2019

चांद्रयान-2 चा अखेरचा टप्पा अयशस्वी झाला असला तरी या एकूणच मोहिमेचे जगभरात कौतुक होत आहे. 'नासा'नेही चांद्रयान-2 मोहिमेमुळे आम्ही भारावून गेलो असल्याचे म्हटले आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या महत्त्वाकांक्षी अशा चांद्रयान-2 मोहिमेची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. जगभरातील माध्यमांनीही या मोहिमेची दखल घेतली. मोहिम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी अजून संपलेलीही नाही. इस्रो आपले काम चोख बजावत आहे, त्यामुळे अंतराळप्रेमींना अजूनही आशा लागून राहिल्या आहेत. 

इस्रोला पहिल्या प्रयत्नात जेवढं यश मिळालं तेवढं यश जगभरातील विविध देशांच्या स्पेस एजन्सीलाही मिळालेलं नाही. त्यामुळेच अंतराळक्षेत्रात प्रसिद्ध असलेली अमेरिकेची स्पेस एजन्सी 'नासा'सुद्धा या मोहिमेमुळे इस्रोच्या प्रेमात पडली आहे.    

चांद्रयान-2 चा अखेरचा टप्पा अयशस्वी झाला असला तरी या एकूणच मोहिमेचे जगभरात कौतुक होत आहे. 'नासा'नेही चांद्रयान-2 मोहिमेमुळे आम्ही भारावून गेलो असल्याचे म्हटले आहे. सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी 'इस्रो'बरोबर काम करण्यास 'नासा' उत्सुक आहे. 'अवकाश अद्‌भुत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा चांद्रयान-2 चा प्रयत्न कौतुकास्पद आहे. तुमच्या या प्रवासामुळे आम्ही भारावून गेलो आहोत आणि सौरमालेचा अभ्यास संयुक्तपणे करण्याची संधी लवकरच मिळेल, अशी आशा करतो,' असे ट्विट 'नासा'ने केले आहे.

या मोहिमेद्वारे भारताने फार मोठा पल्ला गाठला आहे. भारत लवकरच त्यांची अवकाशातील उद्दिष्टे पूर्ण करेल याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असे कौतुकोद्‌गार अमेरिकेच्या दक्षिण आशिया विभागाच्या सहसचिव ऍलिस जी. वेल्स यांनी काढले आहेत.

Image may contain: text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NASA comment about ISROs Chandrayaan 2 mission