Photo : कोरोना चीनला 'लाभदायी'; नासाने केले फोटो शेअर!

वृत्तसंस्था
Monday, 2 March 2020

चीनमधील काही शहरांच्या सीमा सील करण्यापूर्वी (१ ते २० जानेवारी) आणि सीमा सील केल्यानंतर (१० ते २५ जानेवारी)ची परिस्थिती दाखविणारे नकाशे तयार केले आहेत.

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचा सर्वांत मोठा फटका बसलेला चीन या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. कोरोनामुळे चीनमध्ये मोठ्या संख्येने बळी गेले असले तरी त्या देशासाठी हे संकट काही बाबतीत लाभदायी ठरताना दिसते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चीनवरील अवकाशातील प्रदूषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था (नासा) आणि युरोपियन अवकाश संस्थेला (ईएसए) आढळून आले आहे. या संस्थांनी टिपलेल्या उपग्रह छायाचित्रांमधून ही बाब समोर आली आहे. 

- पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळं खळबळ; सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा विचार

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आर्थिक मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे प्रदूषणाच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे नासाने म्हटले आहे. नासाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की चीनमधील वातावरणात नायट्रोजन डाय-ऑक्साईड (एनओ-२) या विषारी वायूच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे दिसते आहे. वाहने, ऊर्जा प्रकल्प आणि औद्योगिक कारखान्यांमधून या विषारी वायूचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन केले जाते. पृथ्वीवरील वातावरणातील प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवणाऱ्या उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून ही माहिती समोर आली आहे. 

No photo description available.

वाहतूक, कारखाने बंद 

कोरोनाच्या उद्रेकानंतर चीनने जानेवारीपासून वुहान शहराकडे जाणारी आणि तेथून येणारी वाहनसेवा बंद केली आहे. वुहानमधील व्यापारी संस्था, उद्योगांचे कामकाजही थांबविण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनकडून ही पावले उचलण्यात आली आहेत. 

- तांदळाचे दाणे मोजून त्याने सांगितली सर्वांत श्रीमंत व्यक्तीची संपत्ती

दोन उपग्रहांचा वापर 

नासा आणि ईएसएकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर एनओ-२ या वायूचे प्रमाण दर्शविणारे नकाशे तयार करण्यात आले आहेत. चीनमधील काही शहरांच्या सीमा सील करण्यापूर्वी (१ ते २० जानेवारी) आणि सीमा सील केल्यानंतर (१० ते २५ जानेवारी)ची परिस्थिती दाखविणारे नकाशे तयार केले आहेत. ईएसएच्या ‘सेंटिनेल- ५’ या उपग्रहावरील ट्रोपोस्फेरिक मॉनिटरिंग इंस्ट्रूमेंट या उपकरणाने पाठविलेल्या माहितीचा वापर यासाठी करण्यात आला आहे. त्याचबरोबर नासाच्या ‘अॅरा’ उपग्रहावरील ओझोन मॉनिटरिंग इंस्ट्रूमेंटने जमा केलेल्या माहितीचाही वापर करण्यात आला आहे. 

No photo description available.

मोठ्या भूभागावरील वातावरणातील प्रदूषणात मोठी घट झाल्याचे दिसून आले असून, अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. ‘एनओ-२’चे प्रमाण वुहानजवळ पहिल्यांदा कमी झाले, त्यानंतर चीनमधील इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती दिसून आली. २००८मधील औद्योगिक मंदीच्या काळातही एनओ-२च्या प्रमाणात घट झाली होती, तरी ते प्रमाण अल्प होते. 
- फेई लियू, ‘नासा’चे संशोधक

- सूर्यमालेबाहेरील 'या' ग्रहावर असू शकते जीवसृष्टी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nasa images show China pollution clear amid slowdown due to coronavirus