अमेरिकेच्या यशात भारतीय वंशाच्या महिलेचं मोठं योगदान; NASA चा रोव्हर मंगळावर उतरला

nasa mars rover indian swati mohan
nasa mars rover indian swati mohan

वॉशिंग्टन - अमेरिकन अंतराळ संस्था नासाचं पर्सिव्हियरन्स रोव्हर हे यान मंगळावर यशस्वीपणे उतरवण्यात आलं. मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही याचा शोध घेण्यासाठी रोव्हर पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मंगळावर असलेल्या दुर्गम अशा जेजेरो क्रेटर भागात यान उतरवलं आहे. नासाने म्हटलं आहे की, पुढची काही वर्षे रोव्हर मंगळावर राहील. या कालावधीत जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या काही खुणांचा शोध रोव्हर घेईल. त्यानंतर मंगळावरून काही नमुने गोळा करून परत येईल. यामुळे भविष्यात माणसाला मंगळावर जाण्यासाठी मार्ग मोकळा होईल. 

अमेरिकेला मंगळावर रोव्हर उतरवण्यात मिळालेल्या यशात भारतीय वंशाची वैज्ञानिक डॉक्टर स्वाती मोहन यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या नियंत्रण आणि लँडिंग सिस्टमचं नेतृत्व केलं. यात सर्वात कठीण असा टचडाऊनचं नेव्हीगेशन करण्याचं काम त्यांच्याकडे होतं. 

अनेक अंतराळ मोहिमांवर काम
कार्नेल विद्यापीठातून स्वाती मोहन यांनी मेकॅनिकल आणि एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर एअरोनॉटिक्समध्ये एमआयटीमधून मास्टर्स आणि पीएचडी पूर्ण केली. स्वाती नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत सुरुवातीला मंगळ रोव्हर मिशनच्या सदस्य होत्या. तसंच नासाच्या इतर अनेक मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनी शनी ग्रहावरचं कॅसिनी आणि चंद्रावरच्या ग्रेल मोहिमेसाठीही काम केलं आहे. 

एका चित्रपटाने निर्माण झाली अंतराळ संशोधनात आवड
स्वाती मोहन यांनी वयाच्या नवव्या वर्षी एक चित्रपट पाहिला होता. स्टार ट्रेक चित्रपट पाहिल्यानंतर त्यातल्या वेगवेगळे भूभाग पाहिल्यानंतर त्यांना उत्सुकता निर्माण झाली. जगातले असे वेगवेगळे भूभाग, सुंदर ठिकाणं शोधायची आहेत असं त्यांना वाटलं. शिक्षण घेत असताना त्यांना बालरोग तज्ज्ञ होण्याची इच्छा होती. मात्र पहिला फिजिक्सचा तास आणि त्या विषयाच्या शिक्षिका यामुळे त्यांच्या अंतराळ संशोधनातील आवडीला आणखी बळ मिळालं.

अखेरची सात मिनिटं महत्वाची
नासाच्या रोव्हरचं मंगळावर लँडिंग होण्याआधीची सात मिनिटे खूप महत्त्वाची होती. खरंतर मोहिमेतील सर्वांचा श्वास रोखून धरणारी अशी सात मिनिटं कठीण होती. रोव्हरच्या लँडिंगचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. लँडिंगच्या अखेरच्या काही मिनिटात स्वाती मोहन यांनी अत्यंत शांतपणे आणि संयमाने काम केलं. त्यांनी टीममधील इतर सदस्यांसोबत योग्य संवाद आणि समन्वय साधत जबाबदारी पार पाडली. 

अमेरिका पहिलाच देश
जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठवलं आहे. 7 महिन्यांपूर्वी याचे पर्सिव्हियरन्स रोव्हरचे प्रक्षेपण करण्यात आलं होतं. रोव्हर 18 फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास यशस्वीपणे लँड झालं. मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा अमेरिका हा पहिलाच देश ठरला आहे.

पहिला फोटो
मंगळावर उतरताच पर्सिव्हियरन्स रोव्हरने पहिला फोटो पाठवला आहे. मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. रोव्हर मंगळावरील माती आणि दगडाचे नमुने गोळा करणार असून त्याच्या आधारावर जीवसृष्टी होती की नाही हे समजणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com