‘नासा’च्या पर्सिव्हरन्स बग्गीने पृथ्वीवर पाठविलेले मंगळाच्या पृष्ठभागाचे पहिले छायाचित्र.
‘नासा’च्या पर्सिव्हरन्स बग्गीने पृथ्वीवर पाठविलेले मंगळाच्या पृष्ठभागाचे पहिले छायाचित्र.

‘नासा’चे पर्सिव्हरन्स मंगळावर उतरले

वॉशिंग्टन - अंतराळातील तब्बल सात महिन्यांच्या प्रवासानंतर अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे ‘पर्सिव्हरन्स’ हे आकाराने सर्वांत मोठे आणि अत्याधुनिक रोव्हर आज मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले. या रोव्हरच्या माध्यमातून मंगळ ग्रहावरील सजीवसृष्टीचा वेध घेण्यात येईल. नासाने या रोव्हरच्या निर्मितीसाठी  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता.

मागील वर्षी ३० जुलै रोजी ‘मंगळ-२०२०’ या मोहिमेला सुरुवात झाली होती.  अमेरिकेच्या फ्लोरिडातील केप कॅनव्हारल येथील प्रक्षेपण केंद्रावरून हे यान अवकाशामध्ये झेपावले होते. हे रोव्हर पृथ्वीपासून ४७२ दशलक्ष किलोमीटर अंतरावर पोचल्यानंतर ते मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या एका मोठ्या विवरात सुरक्षितपणे उतरले, असे नासाने म्हटले आहे. या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरणे हे सर्वांत मोठे यश असल्याचे नासाकडून सांगण्यात आले. यावर भाष्य करताना नासाचे प्रशासक स्टीव्ह जुरझेक म्हणाले की, ‘‘ अमेरिका आणि नासासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे, आम्ही एका शोधाच्या महत्त्वाच्या टोकावर उभे असून पेन्सिलला धार लावत आहोत. एक नवा अध्याय यातून लिहिण्यात येईल. मानवी आदर्शांचे भविष्यासाठी जतन करण्याच्या अनुषंगाने त्याला प्रतिकात्मक रूप देण्याचे काम याद्वारे करण्यात आले आहे. यामुळे मंगळ ग्रहावरील संशोधनाला देखील चालना मिळू शकेल.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पृष्ठभागावर होणार संशोधन
हे रोव्हर तब्बल दोन वर्षे मंगळाच्या पृष्ठभागावर राहून विविध नमुने गोळा करत संशोधन करणार आहे. एका अर्थाने हे रोव्हर रोबोटिक जैवसंशोधक आणि सुक्ष्मजीव अभ्यासक देखील आहे. जेझेरोच्या विवरामधील अतिप्राचीन  तळ्याचा परिसर नदीसंदर्भातील माहिती याद्वारे गोळा करण्यात येईल. याद्वारे या प्रदेशाची भूतकाळातील जैविक संरचना आणि वातावरण यांचाही अभ्यास केला जाणार आहे. अवकाशजीवशास्त्रात संशोधन करणे हा देखील या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक असल्याचे संशोधकांनी सांगितले. या रोव्हरने संकलित केलेल्या नमुन्यांचा पृथ्वीवरील संशोधक अभ्यास करणार असून त्याद्वारे तेथील सजीवसृष्टीचा वेध घेण्यात येईल.

अन्य ग्रहावर ड्रोन उडविले
या रोव्हरच्या निमित्ताने अन्य ग्रहाच्या वातावरणामध्ये ड्रोन उडविण्याचा अनोखा प्रयोग नासाने केला आहे. यामुळे अंतराळ मोहिमांचे आयाम बदलणार आहेत. इन्जेन्यूइटी हेलिकॉप्टर हे ३१ दिवस मंगळाच्या वातावरणात उड्डाण करणार आहे. या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे वेगळे तंत्रज्ञान जगासमोर मांडतो आहोत. यासाठी कुठल्याही प्रकारच्या विज्ञानविषयक डेटा संकलनाची गरज नाही. भविष्यातील विज्ञानाकडून याची प्रेरणा मिळाली आहे, असे नासाचे वरिष्ठ संशोधक गौतम चट्टोपाध्याय यांनी सांगितले.

इस्रोला देखील लाभ
नासाच्या मंगळ मोहिमेचा मोठा लाभ भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला देखील होईल. भविष्यात केवळ मंगळाच्या कक्षेपर्यंत मर्यादा असणाऱ्या मोहिमांची आखणी करणे भारताला शक्य होणार आहे. पर्सिव्हरन्स हे नासाचे सर्वांत अत्याधुनिक असे रोव्हर आहे. नासाचे यश ही संधींची घोषणा असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. भविष्यामध्ये शुक्रावरील मोहीम आखण्याचाही इस्रोचा विचार असून अन्य प्रकल्पांना देखील या रोव्हरचे मोठे साहाय्य होणार आहे. सध्या इस्रोचे लक्ष हे चांद्रयान-३ आणि गगनयान या दोन प्रकल्पांवर असून कोरोनामुळे त्यांना विलंब झाला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com