नवाज शरीफांच्या डोक्‍यावर टांगती तलवार

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

"पनामा पेपर्स'मध्ये शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे समोर आल्यानंतर पाकिस्तानात खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान, "पनामा पेपर्स'मध्ये करण्यात आलेले आरोप शरीफ यांनी फेटाळून लावले होते. पाकिस्तानातून एक पैसाही आपण गैरमार्गाने देशाबाहेर पाठविलेला नाही, असे शरीफ यांनी म्हटले होते.

 

इस्लामाबाद - बहुचर्चित "पनामा पेपर्स'मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याची दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या प्रकरणाचे शरीफ यांच्या राजकीय कारकिर्दीवर गंभीर परिणाम होतील, अशी शक्‍यता राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

पंतप्रधान शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी दररोज घेण्यात येईल, असे पाच सदस्यीय खंडपीठाने स्पष्ट केले. दोन आठवड्यांच्या खंडानंतर या प्रकरणाची आज सुनावणी झाली, त्या वेळी न्यायाधीश असिफ सईद खोसा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वरील निर्णय दिला.

शरीफ यांच्या विरोधातील प्रकरणाची दररोज सुनावणी घेण्याची मागणी पाकिस्तानातील सर्वच विरोधी पक्षांनी केली होती. पाकिस्तान तेहरिके इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख व माजी क्रिकेटवीर इम्रान खान हे यात आघाडीवर होते. इम्रान खान यांच्यासह पाच जणांनी शरीफ यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पैशांची आफरातफर करून लंडनमध्ये संपत्ती जमा केली असल्याचा आरोप "पनामा पेपर्स'चा हवाला देत या याचिकांमध्ये करण्यात आला आहे.
विदेशात बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून संपत्ती जमा केली जात असल्याचा गौप्यस्फोट "पनामा पेपर्स'च्या माध्यमातून मागील वर्षी करण्यात आला होता. "पनामा पेपर्स'मध्ये शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे समोर आल्यानंतर पाकिस्तानात खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान, "पनामा पेपर्स'मध्ये करण्यात आलेले आरोप शरीफ यांनी फेटाळून लावले होते. पाकिस्तानातून एक पैसाही आपण गैरमार्गाने देशाबाहेर पाठविलेला नाही, असे शरीफ यांनी म्हटले होते.

राजकारणावर दुरगामी परिणाम
या प्रकरणाचा निकाल काहीही लागला तरी त्याचे पाकिस्तानच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहेत. कारण, पुढील वर्षात पाकिस्तानात निवडणुका होत असून, विरोधी पक्षातील इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिके इन्साफ पक्षाची अवघी प्रचार मोहीम शरीफ यांच्या विरोधातील कथित भ्रष्टाचारांच्या आरोपांभोवती फिरत राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे निकाल शरीफ यांच्या बाजूने लागल्यास त्याचा फटका इम्रान खान यांच्या पक्षाला बसू शकतो. तर दुसरीकडे, निकाल विरोधात गेल्यास शरीफ यांची राजकीय कारकीर्द धोक्‍यात येऊ शकते.

कोणाच्या विरोधात आहेत आरोप?
नवाज शरीफ
मरियम शरीफ
हसन शरीफ
हुसेन शरीफ

Web Title: Nawaz Sharif faces problems