शरीफ यांना तुरुंगात पाठविल्यास निवडणुकीत चांगल्या जागा मिळतील

वृत्तसंस्था
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

2008 मध्ये जेव्हा पाकिस्तान पीपल्स पक्ष सत्तेत आला, तेव्हा देशात भयानक परिस्थिती होती. देश मोठ्या संकटात होता; मात्र पाकिस्तान पीपल्स पक्षाने यशस्वीपणे ते सोडविले. मात्र, पाकिस्तान मुस्लिम लीगने (नवाज गट) सर्व काही उद्‌ध्वस्त केले आणि आज देश पुन्हा संकटात सापडला आहे

इस्लामाबाद - माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना तुरुंगात पाठविल्यास मध्य पंजाबसह देशाच्या अन्य भागातही पाकिस्तान पीपल्स पक्ष 2019 च्या निवडणुकीत चांगल्या जागा मिळतील, असे मत पाकिस्तान पीपल्स पक्षाचे सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आज येथे स्पष्ट केले, असे वृत्त 'नेशन' या दैनिकाने दिले आहे.

पेशावर येथे मंगळवारी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात झरदारी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यकारभार सांभाळण्यास माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे असमर्थ आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला. पाकिस्तान पीपल्स पक्ष जनतेला चांगला माहीत असून, 2013 च्या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचेही सर्वांनाच माहीत आहे. मात्र, पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) याला सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्यात आले, असे झरदारी म्हणाले.

2008 मध्ये जेव्हा पाकिस्तान पीपल्स पक्ष सत्तेत आला, तेव्हा देशात भयानक परिस्थिती होती. देश मोठ्या संकटात होता; मात्र पाकिस्तान पीपल्स पक्षाने यशस्वीपणे ते सोडविले. मात्र, पाकिस्तान मुस्लिम लीगने (नवाज गट) सर्व काही उद्‌ध्वस्त केले आणि आज देश पुन्हा संकटात सापडला आहे, असे ते म्हणाले.

Web Title: nawaz sharif pakistan corruption