
Imran Khan : इम्रान यांना शह देण्यासाठी नवा पक्ष; ‘पीटीआय’मधून बाहेर पडलेल्यांना लष्कराचे पाठबळ
लाहोर : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष इम्रान खान यांच्याविरोधात शंभरहून अधिक गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना आता राजकीय धक्केही बसत आहेत. त्यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षातून अनेक नेते बाहेर पडले असून ते आता एकत्र येऊन नवा पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली करत आहेत.
त्यांच्या या नव्या पक्षाला पाकिस्तानमधील सर्वशक्तिमान लष्कराचेही पाठबळ असून या जोरावर ऑक्टोबरमध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक ते लढविणार आहेत. हा नवा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग आणि सत्तेतील इतर पक्षांनाही आव्हान देऊ शकतो. इम्रान खान यांचे जुने मित्र जहांगीर खान तरीन हे नव्या गटाचे नेतृत्व करत आहेत.
मागील महिन्यात इम्रान खान यांच्या अटकेनंतर देशभर हिंसक आंदोलन उसळत लष्करी कार्यालयांवर हल्ले सुरु झाल्यामुळे पाकिस्तान तेहरीके इन्साफ (पीटीआय) पक्षातील जहांगीर खान तरीन यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी पक्षत्याग करणे पसंत केले होते. ‘पीटीआय’च्या शंभरहून अधिक नेत्यांनी आणि आमदार-खासदारांनी तरीन यांना साथ दिली आहे.
हे सर्वजण मिळून इस्तेहकामे पाकिस्तान पार्टी (आयपीपी) स्थापन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पक्षाला लष्कराचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे येथील राजकीय विश्लेषकांचे म्हणणे असून आगामी निवडणुकीत या पक्षाला जनतेचा चांगला पाठिंबा मिळून सत्तेतही महत्त्वाचा वाटा मिळेल, असा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जात आहे.
‘पीटीआय’च्या सध्याच्या स्थितीला इम्रान यांचे धोरणच कारणीभूत असल्याची टीका या पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी केली. त्यामुळे ‘आयपीपी’ म्हणजे इम्रान खान यांना वगळून तयार झालेला नवा पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षच आहे, असे मत फिरदौस आशिक अवान यांनी व्यक्त केले.
लष्कराकडून दबाव : इम्रान
मला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठीच लष्कराने माझ्या पक्षातील नेत्यांवर दबाव आणून त्यांना पक्ष सोडायला भाग पाडले, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. मागील महिन्यातील हिंसाचारानंतर त्यांच्या पक्षातील अनेकांनी राजकारण सोडण्याचे जाहीर केले होते. मात्र, दोन आठवड्यातच ते आता नव्या पक्षात सहभागी होत आहेत.