
New Sansad Bhavan : नव्या संसदेतील म्युरलमुळे नेपाळमध्ये वाद, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Mural In New Parliament Shows Ashoka Empire : नुकतेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या संसद भवनाच्या इमारतीच्या डिझाइनपासून ते इथल्या इंटेरियरपर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा झाली. पण या भवनात लावलेल्या एका म्युरलने नव्या वादाला तोंड फोडले आहे. विशेष म्हणजे हा वाद भारतात नाही तर नेपाळमध्ये उठला आहे.
नव्या संसद भवनमध्ये लावण्यात आलेल्या भित्तीचित्रात (म्युरल) सम्राट अशोकाचे संपूर्ण साम्राज्य दाखवण्यात आलं आहे. शेजारील अनेक देशांचा यात समावेश असून अखंड भारताचा हा नकाशा आहे असा त्याचा अर्थ लावला जात आहे.
द हिंदूच्या वृत्तानुसार एका मीडिया ब्रीफिंगमध्ये, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ऐतिहासिक अशोक साम्राज्याचा प्रसार दर्शविणारी एक कलाकृती म्हणून भिंतीचे वर्णन केले. या म्युरलमधून अशोक साम्राज्याचा प्रसार आणि जबाबदारी आणि लोकाभिमुख शासनाची कल्पना जी त्यांनी अंगीकारली आणि प्रसारित केली होती तेच प्रदर्शित होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
समोरचे म्युरल हेच सांगते. त्यात अजून काही सांगण्यासारखे नाही. इतर राजकीय नेते काय बोलतात त्यावर मी भाष्य करणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अनेक शेजारील देशांच्या भागांचा समावेश असलेल्या 'अखंड भारत'चा नकाशा म्हणून त्याचा अर्थ लावला जात असल्याने नेपाळमध्ये या भित्तीचित्रामुळे वाद निर्माण झाला. हे म्युरल भूतकाळातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे दर्शविते आणि सध्याच्या पाकिस्तानमधील तत्कालीन तक्षशिला येथील प्राचीन भारताचा प्रभाव दर्शविते.
नेपाळमधल्या अनेक राजकीय नेत्यांनी म्युरलवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्यापैकी काहींनी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांना हा मुद्दा नवी दिल्लीकडे मांडण्यास सांगितले.
नेपाळचे पंतप्रधान सध्या भारत दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी गुरुवारी सांगितले की नेपाळच्या पंतप्रधानांनी त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान या म्युरलचा मुद्दा उपस्थित केला नाही. शिवाय या प्रकरणावर नेपाळमध्ये निदर्शने सुरू आहेत की नाही हे त्यांना माहिती नाही असे बागची यांनी सांगितले.
नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराई यांनी मंगळवारी सांगितले की, संसदेच्या नवीन इमारतीतील 'अखंड भारत' म्युरल त्याच्या जवळच्या परिसरात प्राचीन भारतीय विचारांचा प्रभाव दर्शविल्याने अनावश्यक राजनयिक विवाद होऊ शकतात.