चांद्र बॅगेला लिलावात मिळाले 18 लाख डॉलर

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

न्यूयॉर्क: अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी जी बॅग वापरली, तिला येथील लिलावात 18 लाख डॉलर एवढी किंमत मिळाली.

न्यूयॉर्क: अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी जी बॅग वापरली, तिला येथील लिलावात 18 लाख डॉलर एवढी किंमत मिळाली.

अमेरिकेच्या अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले या घटनेला 48 वर्षे झाली. त्यानिमित्त चांद्र मोहिमांसदर्भातील वस्तूंचा लिलाव न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी झाला. एका व्यक्तीने दूरध्वनीवरून लिलावात भाग घेत ही बॅग खरेदी केली. संबंधित ग्राहकाने आपले नाव उघड करू नये, अशी इच्छा व्यक्त केल्याचे लिलावाचे आयोजन करणाऱ्या "सोथबे' या कंपनीने सांगितले. या बॅगेला 20 ते 40 लाख डॉलर मूल्य मिळेल, असा कंपनीचा अंदाज होता. लिलावात ठेवलेल्या वस्तूंमध्ये या बॅगेला सर्वाधिक किंमत मिळाली आहे. याआधी ह्यूस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटर येथे ही बॅग अनेक वर्षे पडून होती.

अंतराळ मोहिमांच्या इतिहासाची आठवण असलेल्या वस्तूंची लिलावातून विक्री करण्यावर येथील एका गटाने टीका केली आहे. ही चांद्र बॅग संग्रहालयाचा ठेवा आहे. तेथे ती ठेवल्यास सर्वांना ती पाहता येईल. मानवाने अवकाश संशोधनात घेतलेल्या भरारीची ही बॅग निदर्शक आहे, असे मत "ऑल मूनकाइंड' या संस्थेचे सहसंस्थापक मायकेल हॅनलॉन यांनी व्यक्त केले. "अपोलो' चांद्र मोहिमेतील अंतराळ याने ज्या ठिकाणी उतरली त्या जागांचे जतन व संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने उपाययोजना करावी, यासाठी ही स्वयंसेवी संस्था पाठपुरावा करीत आहे.

अवकाश मोहिमेतील वस्तू
लिलावात अन्य वस्तूंमध्ये "अपोलो 13' या अवकाश मोहिमेच्या लेखी प्रतीची विक्री दोन लाख 75 हजार डॉलरला झाली. अमेरिकेचे अंतराळवीर गुस ग्रीसम यांच्या "स्पेससूट'ला 43 हजार 750 डॉलर, तर नील आर्मस्ट्रॉंगने बझ ऑल्ड्रिनचे चंद्रावर काढलेल्या प्रसिद्ध छायाचित्राला 35 हजार डॉलर मिळाले.

Web Title: new york news moon bag Auction