
Diwali Holiday: अमेरिकेतही मिळणार दिवाळीला सरकारी सुट्टी! न्यूयॉर्क विधानसभेत कायदा करण्याची तयारी
अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांच्या वाढत्या प्रभावामुळे तिथे दिवाळीची सरकारी सुट्टी घोषित करण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भात न्यूयॉर्कच्या विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यानंतर दिवाळीला सुट्टी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रस्तावात दिवाळीसोबतच न्यूयॉर्कमध्ये लूनर न्यू ईयरला सरकारी सुट्टी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
न्यूयॉर्क विधानसभेचे अध्यक्ष कार्ल हॅस्टी यांनी काल (बुधवारी) एक निवेदन जारी केले आणि सांगितले की, न्यूयॉर्कच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीला ओळखण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहे. ते म्हणाले, 'विधानसभेत लूनर न्यू ईयरला आणि दिवाळीला सुट्टी देण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन संपण्यापूर्वी हा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. या निर्णयाचा शाळेच्या कॅलेंडरवर काय परिणाम होणार, यावर चर्चा सुरू आहे.
याचा फायदा भारतीय समुदायाला मिळेल
न्यूयॉर्क असेंब्लीचे अधिवेशन ८ जूनपर्यंत चालणार आहे. अधिवेशन संपेपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. दिवाळी दिवस कायदा नावाच्या या प्रस्तावामुळे दिवाळीची सुट्टी न्यूयॉर्कमधील 12वी सरकारी सुट्टी होईल. याचा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या समुदायाला खूप फायदा होईल. आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत दिवाळीचा सण चांगला साजरा करू शकतील.
न्यूयॉर्क असेंब्लीच्या सदस्य जेनिफर राजकुमार आणिसीनेटर जोए अद्दाबो यांनी न्यूयॉर्क शहरातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. न्यूयॉर्क स्टेट कौन्सिल मेंबर शेखर कृष्णन आणि कौन्सिल वुमन लिंडा ली यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. दिवाळीला सरकारी सुट्टी देण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती, ती लवकरच पूर्ण होणार आहे. अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यात आधीच सुट्टी देण्याचा कायदा आहे.