'न्यूजवीक'मध्ये गोंधळाचे वातावरण; संपादकांना तातडीने हटविले 

Old Issue of Newsweek
Old Issue of Newsweek

न्यूयॉर्क : 'न्यूजवीक' या या प्रतिष्ठित डिजिटल पोर्टलचे मुख्य संपादक आणि कार्यकारी संपादक यांना व्यवस्थापनाने तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडल्याच्या वृत्ताने अमेरिकेतील माध्यम विश्‍वात खळबळ उडाली आहे. त्यातच, 'न्यूजवीक'च्या न्यूयॉर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 'आजचे काम थांबवा आणि घरी जा' अशा सूचना मिळाल्याने कर्मचारीही अस्वस्थ झाले आहेत. 

येत्या 17 फेब्रुवारीला 85 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या 'न्यूजवीक'मध्ये गेल्या काही महिन्यांपासून बदलांची प्रक्रिया सुरू आहे. ३१ डिसेंबर २०१२ नंतर 'न्यूजवीक'ने छापील आवृत्ती बंद करून डिजिटल मीडियावर लक्ष केंद्रीत केले. 'न्यूजवीक मीडिया ग्रुप'चे अध्यक्ष एटिन युझॅक आणि कंपनीच्या आर्थिक संचालिका मरियन किम या दोघांनीही राजीनामा दिला होता. गेल्या महिन्यात मॅनहॅटनच्या जिल्हा प्रशासकांनी 'न्यूजवीक'च्या कार्यालयावर छापे टाकले होते. यासंदर्भात 'न्यूजवीक'मध्येच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 'न्यूजवीक मीडिया ग्रुप'मधील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. ही बातमी प्रसिद्ध करणारी वरिष्ठ बातमीदार सेलिस्टे काट्‌झ यांनाही व्यवस्थापनाने राजीनामा देण्यास सांगितले. 

'न्यूजफीड'चे 'चीफ कन्टेंट ऑफिसर' डॅयन कॅन्डप्पा यांच्याबाबतही काट्‌झ यांनी एक वादग्रस्त विषय प्रसिद्ध केला होता. 'न्यूजवीक'मध्ये रुजू होण्यापूर्वी 'रॉयटर्स'मध्ये नोकरीला असताना कॅन्डप्पा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. काट्‌झ यांनी हा विषय समोर आणल्यानंतर 'न्यूजवीक'ने एका त्रयस्थ कायदाविषयक काम करणाऱ्या संस्थेला अंतर्गत चौकशी करण्याची जबाबदारी सोपविली होती. 

'सीएनएन'च्या वृत्तात नमूद केल्याप्रमाणे 'न्यूजवीक'च्या अनेक कर्मचाऱ्यांनी इतरत्र संधी शोधण्यास सुरवात केली आहे. व्यवस्थापनाने ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली, त्याचा निषेध म्हणून वरिष्ठ लेखक मॅथ्यू कूपर यांनीही राजीनामा दिला आहे. 

विविध स्रोतांमधून मिळालेल्या माहितीनुसार, 'इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स'च्या संपादक नॅन्सी कूपर यांच्याकडे 'न्यूजवीक'ची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com