वाट काढत जाणारा 'इतिहास'

Donald Trump, Barack Obama
Donald Trump, Barack Obama

"द एन्ड ऑफ हिस्टरी'ची म्हणजे इतिहासाचाच अंत झाल्याची द्वाही फिरविणाऱ्या फ्रान्सिस फाकुयामाची आठवण पुन्हा होण्याचं तसं काही कारण नव्हतं. 1989 मध्ये "फॉरेन अफेअर्स' नियतकालिकात जेव्हा त्यांनी हा निबंध लिहिला, त्याला पार्श्‍वभूमी होती, ती सोव्हिएत महासंघ आणि अमेरिका यांच्यातील विशिष्ट स्वरुपाचे शीतयुद्ध संपल्याची.

सोव्हिएत संघराज्याचे विघटन झाल्यामुळे "समाजसत्तावाद' आणि खुली-उदार व्यवस्था यांच्यातील संघर्षात खुल्या व्यवस्थेचा निर्णायक विजय झाला आहे, असे फाकुयामा यांनी या निबंधातून घोषित करून टाकले होते! जगातील हा कळीचा संघर्षच संपुष्टात आल्याने मुक्त बाजारपेठेवर आधारित व्यवस्थेला आव्हान मिळण्याची शक्‍यताच नष्ट झाली आहे; आणि संघर्षच नाही, म्हणजे इतिहासच थबकणे, असा हा फाकुयामांचा सिद्धांत. मुळात त्यावेळीदेखील यातल्या गृहितकांवर गंभीर शंका उपस्थित केल्या गेल्या होत्याच. मानवी इतिहास असा चिमटीत पकडण्याचे, त्याचे सार मांडू पाहण्याचे कितीतरी प्रयत्न आजवर फोल ठरले आहेत.

पण ते जाऊद्यात. समाजसत्तावाद आणि मुक्त भांडवलशाही हाच काय तो मानवी इतिहासातील मध्यवर्ती संघर्ष आहे, असे वादाकरता मान्य केले, तरी त्यावेळीही त्याचा "अंतिम निकाल' लागला, हे म्हणणे धाडसाचे होते. या खुल्या व्यवस्थेचे कर्णधारपद अमेरिकेकडे आहे, असे फाकुयामा यांनी गृहीत धरले होते. अमेरिकेत उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयामुळे पुन्हा एकदा फाकुयामांची आठवण जागी होणे, स्वाभाविकच. याचे कारण आता दस्तुरखुद्द त्याच देशात म्हणजे अमेरिकेतच खुलीकरणाला, उदारमतवादी विचाराला आव्हान निर्माण झाले आहे. इतिहास चकवा देतो तो असा. राजकीय विचारसरणी, संघटना, प्रशासन या कशाशीच दुरान्वयानेही संबंध नसलेला डोनाल्ड ट्रम्प नावाचा उद्योगपती अमेरिकेसारख्या महासत्तेच्या अध्यक्षपदी निवडून येतो आणि तोही "आर्थिक संरक्षक भिंती' उभ्या करण्याची भाषा करीत! फाकुयामा यांच्यासारख्यांचा कथित अभिमान गळून पडण्यासाठी हा पुरेसा हादरा आहे, असे म्हणायला हवे. 

कसले खुलेपण आणि कसला उदारमतवाद? भले कर्तृत्वाच्या, गुणवत्तेच्या आणि "किफायतशीरपणा'च्या जोरावर बाहेरचे लोक अमेरिकेतील नोकऱ्या पटकावत असतील, पण त्यामुळे स्थानिक गोऱ्या लोकांच्या संधी हिरावल्या जात आहेत. म्हणूनच या "बाहेरच्यां'ना अडविले पाहिजे, असे ट्रम्प प्रत्येक प्रचारसभेमधून सांगत होते. वास्तविक स्थलांतरितांनीच जो देश घडविला, तेथेच आता "भूमिपुत्र' आणि "परके' अशी विभागणी जोरात केली जाऊ लागली आहे. ताज्या निवडणुकीचे तेच "ट्रम्पकार्ड' होते. मेक्‍सिकन, आफ्रिकी, आशियाई आदी स्थलांतरितांनी मूळच्या अमेरिकनांवर कुरघोडी चालविल्याचा कांगावा करीत, या सगळ्यांना हाकलून देण्याची गर्जना करीत ट्रम्प यांचा रथ थेट "व्हाइट हाऊस'पर्यंत जाऊन थडकला आहे. अमेरिकेतलाच अंतर्विरोध असा उफाळून आल्याने खुल्या आणि उदारमतवादी विचारसरणीचे काय, असा प्रश्‍न साहजिकच उपस्थित झाला आहे. वांशिक-सांप्रदायिक अस्मिता आणि त्यावर आधारलेल्या राष्ट्रवादाविषयीची ही वाढती लोकप्रियता म्हणजे पुन्हा मागे जाणे नव्हे काय; हा प्रश्‍नही ओघानेच उपस्थित झाला. एवढेच नव्हे तर "खुल्या आणि उदार वैचारिक प्रारूपा'चा हा पराभव नाही काय, असेही विचारले जाऊ लागले. 

ट्रम्प विरुद्ध हिलरी क्‍लिंटन यांच्यात जे प्रचारयुद्ध रंगले, त्यात निंदानालस्ती, चारित्र्यावर चिखलफेक, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप यांचाच धुरळा उडत होता, त्यामुळे अशा मूलभूत प्रश्‍नांची उत्तरे मिळण्याची शक्‍यता दुरावली होती, हे खरेच आहे. संपूर्ण प्रचार इतक्‍या खालच्या पातळीला गेला होता, की हीच का प्रगत-पाश्‍चात्य लोकशाही? असे वाटावे. पण काही सुखद अपवाद होते. सत्ता आठ वर्षे ज्या बराक ओबामा यांनी अमेरिकी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली, त्यांनी यातल्या काही प्रश्‍नांची चर्चा केली. "इकॉनॉमिस्ट'मध्ये त्यांनी प्रचाराच्या काळात एक विशेष लेख लिहिला. दुर्दैवाने त्या लेखाकडे काहीसे दुर्लक्षच झाले. पण त्यातील मर्मदृष्टी आणि अनुभवाधारित बोल महत्त्वाचे असल्याने त्याची चर्चा व्हायला हवी. 

तंत्रविज्ञानातील क्रांती, स्थलांतर, व्यापार यांतूनच जो अमेरिका हा देश बहरला, तेथेच स्थलांतराविरोधी, सर्जनशीलताविरोधी मानसिकता तयार व्हावी, हे दुर्दैवी असल्याचे नमूद करतानाच त्याची कारणे शोधण्याचा ओबामा प्रयत्न करतात. गेल्या काही वर्षांत उत्पादकतेचा विकास रखडला आहे, परिणामतः कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांच्या आर्थिक विकासाच्या आकांक्षांना धक्का बसला आहे. जागतिकीकरण आणि ऑटोमेशन यामुळे अनेक नोकऱ्यांवर गदा आली आहे. अनेक डॉक्‍टर, इंजिनिअर्सही "उत्पादक नवनिर्माणा'ऐवजी वित्तसेवा क्षेत्रात आपली शक्ती-बुद्धी खर्च करताना दिसताहेत, अशी निरीक्षणे नोंदवून ओबामा म्हणतात, की अशा परिस्थितीत राजकारणात उतरलेला कोणी "मसिहा' हे सगळे कोणत्या तरी षडयंत्रामुळे घडले आहे, असे सांगू लागतो. जागतिकीकरणाचे चक्र उलटे फिरवायला हवे, असेही म्हणू लागतो. अशी मांडणी करणाऱ्यांना उत्तर देताना ओबामा लिहितात, ""गेल्या 25 वर्षांचा आढावा घेतला तर कमालीच्या दारिद्य्रात खितपत पडलेल्यांची संख्या 30 टक्‍क्‍यांवरून दहा टक्‍क्‍यांवर आली आहे. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान विकास याशिवाय हे घडू शकले नसते.'' आता या वास्तवाचा अर्थ कसा लावायचा? आजच्या जगात एक विरोधाभास निर्माण झाला आहे. पूर्वीपेक्षा जग समृद्ध झाले आहे; परंतु आपल्या विविध समाजांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे, अशी कोंडी जेव्हा निर्माण होते, तेव्हा लंबक दुसऱ्या टोकाला नेण्याचा प्रयत्न करणारे वरचढ होतात. पुन्हा एकदा बंदिस्त आणि संरक्षित अर्थव्यवस्थेकडे जाऊ पाहणाऱ्यांनी नेमके हेच केले. ट्रम्प हे त्यांचे प्रवक्त बनले. त्यामुळे डावे आणि उजवे यांच्यात इतर अनेक मुद्यांवर प्रचंड मतभिन्नता असली तरी "आर्थिक संरक्षकवाद' या विषयावर ते सारखी भाषा बोलू लागले. 

पण अशा टोकाच्या प्रतिक्रियांपासून सावध राहण्याची सूचना देताना ओबामा नफ्याच्या प्रेरणेने झालेल्या प्रगतीची रास्त नोंद घेत विषमतेच्या प्रश्‍नालाही हात घालतात. खऱ्या अर्थाने "खुल्या' आणि "मुक्त' ऐवजी त्या नावाखाली काहींची मक्तेदारी निर्माण होते. योग्यवेळी योग्य माहिती मिळण्यापासून काहीजण वंचित राहतात. बाजारपेठ खऱ्या अर्थाने मुक्त राहतच नाही. त्यामुळेच खुली व्यवस्था म्हणजे "नियमनरहित' व्यवस्था नव्हे, याची ओबामा जाणीव करून देतात. हे नियमन "लेव्हल प्लेईंग फिल्ड' निर्माण करणारे असले पाहिजे, नवे हितसंबंध निर्माण करणारे नव्हे. हे सांगतानाच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ते मांडतात तो विषमतेच्या अनिष्ट परिणामांचा. विकासाचा परिघ रुंदावलेला असणे हे अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दृष्टीने उपकारक असते. वंचितांच्या वाढलेल्या आकांक्षा आणि त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नातील सरकारी कारभाराची गती यांच्यातील तफावत असंतोष वाढवत राहते. त्यातून "व्यवस्थे'वरचा विश्‍वास उडू लागतो. 

विकास साधायचा असेल तर हा "विश्‍वास' आवश्‍यक आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढती विषमता अनिष्ट आहे, हे केवळ नैतिक दृष्टिकोनातून केलेले विधान नसून, सातत्यपूर्ण विकासाच्या दृष्टीने केले आहे, हा ओबामा यांचा निष्कर्षही महत्त्वाचा आहे. अमेरिकेत 1979 मध्ये एक टक्का लोकांकडे सात टक्के संपत्ती होती, 2007 मध्ये हे प्रमाण दुपटीहून अधिक म्हणजे सतरा टक्‍क्‍यांवर गेले. या वाढत्या विषमतेमुळे वरचा वर्ग आणि खालचा वर्ग यांच्यात अभेद्य भिंत उभी राहते, खालच्या वर्गातून वरच्या वर्गात जाण्याची लवचिकता नष्ट होते. अर्थतज्ज्ञांनी हे दाखवून दिले आहे, की ज्या देशांमध्ये विषमतेचे प्रमाण जास्त आहे, तेथील वाढ अनिश्‍चित असते आणि मंदीची आवर्तनेही जास्त असतात. याउलट जेथे विषमतेचे प्रमाण कमी असते, तेथे वाढ जोमाने, सातत्याने होते. ओबामा यांचे हे विवेचन केवळ अमेरिकेपुढीलच नव्हे तर जगातील अनेक देशांतील परिस्थितीला लागू पडणारे आहे. 

दुर्दैवाने प्रचाराच्या रणधुमाळीत अशा विषयांना फारसे स्थान मिळाले नाही. पण "इतिहास' असा थांबत नसतो, हा मुद्दा पटण्यासाठीतरी या विवेचनाचा नक्कीच उपयोग होईल. विकासाला गती देणारे आणि विषमतेचे प्रमाण कमी करत नेणारे जे "प्रारूप' ओबामांच्या मनात आहे, ते पुढील वाटचालीची दिशा असू शकते; मग तेथे सरकार कोणाचेही असो. डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचारातील वक्तव्ये आणि निकाल जाहीर झाल्यानंतरची वक्तव्ये यात जमीन अस्मानाचा फरक होता, ही बाब त्यादृष्टीने लक्षणीय आहे. आवर्जून सांगण्याचा मुद्दा हा की इतिहास गोठत नसतो.... वाट काढत किंवा बदलत तो पुढे जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com