आईशप्पथ! निजामाचा हिरा इतक्या कोटींचा??

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जून 2019

कतारमधील "अल-थानी' राजघराण्याशी संबंधित वस्तूही या लिलावामध्ये झळकल्या, मुघलसम्राट शहाजहानच्या कट्यारला 23.4 कोटी रुपये एवढी किंमत मिळाली, तर हैदराबादच्या निजामाच्या शाही तलवारीला 13.4 कोटी एवढी किंमत मिळाली.

न्यूयॉर्क : येथे "ख्रिस्तीज' या संस्थेने भारतीय राजघराण्यांशी संबंधित जवळपास दहा कोटी नव्वद लाख डॉलर किमतीच्या विविध मौल्यवान वस्तूंचा लिलाव केला. यामध्ये मुघलसम्राट शहाजहान यांची हिरव्या रत्नांनी मढवलेली कट्यार, हैदराबादचा निजाम उत्सावाप्रसंगी वापरत असे ती तलवात, तसेच मौल्यवान रत्नांनी मढवलेला मध्ययुगीन हुक्का याप्रमाणे अन्य चारशे वस्तूंचा समावेश होता. आतापर्यंतच्या लिलावांमध्ये भारतीय कला आणि मुघलकालीन वस्तूंना जेवढी किंमत मिळाली त्यापेक्षा अधिक किंमत या वस्तूंना प्राप्त झाल्याचे "ख्रिस्तीज'ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. 

कतारमधील "अल-थानी' राजघराण्याशी संबंधित वस्तूही या लिलावामध्ये झळकल्या, मुघलसम्राट शहाजहानच्या कट्यारला 23.4 कोटी रुपये एवढी किंमत मिळाली, तर हैदराबादच्या निजामाच्या शाही तलवारीला 13.4 कोटी एवढी किंमत मिळाली. आतापर्यंत सर्वाधिक दराने विकल्या गेलेल्या तलवारींमध्ये तिचा समावेश झाला आहे. मौल्यवान रत्नांनी मढवलेला हुक्का 5.27 कोटी रुपयांना विकण्यात आला. तब्बल बारा तास चाललेल्या या लिलावामध्ये भारतीय बनावटीच्या वस्तूच टॉप परफॉर्मर ठरल्या आहेत. या लिलावादरम्यान 29 वस्तूंना दहा लाख डॉलरपेक्षा अधिक किंमत मिळाली. दोन भारतीय हिऱ्यांनादेखील या वेळी चांगली किंमत मिळाली. 

diamond

हिऱ्याची चमक 
पॅराडाईज हिऱ्याची प्रतिकृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 52.58 कॅरेटच्या हिऱ्याला तब्बल 45 कोटी रुपयांची किंमत मिळाली. गोवळकोंडा येथील खाणीमध्ये हा हिरा सापडला होता. सतरा कॅरेटच्या गोवळकोंडा "आर्कोट-2' या हिऱ्याला 23.5 कोटी रुपयांची किंमत मिळाली. ब्रिटिश राजे जॉर्ज तृतीय यांनीदेखील हा हिरा धारण केला होता. हैदराबादच्या निजामाच्या हिऱ्यांच्या हाराला 17 कोटी रुपये एवढी किंमत मिळाली. या हारामध्ये 33 हिऱ्यांचा समावेश आहे. जयपूर, इंदूर आणि बडोदा येथील राजघराण्यांच्या वस्तूंचे प्रतिबिंब या लिलावामध्ये उमटले. बडोद्याच्या महाराणी सीतादेवी यांच्या ब्रेसलेट 11.4 कोटी रुपयांची किंमत मिळाली. जयपूर संस्थानच्या राजमाता गायत्रीदेवी हिऱ्याच्या अंगठीला 4.45 कोटी रुपयांची किंमत मिळाली. 

diamond


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nizams royal jewellery collection fetches Rs 45crore at Christies auction