‘फोन रेकॉर्ड’ने केला इम्रान खान यांचा घात

इम्रान खान यांनाही आता लष्कराची नाराजी निर्माण झाल्यानेच नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे बोलले जाते.
no confidence motion Phone record kills Pakistan pm Imran khan
no confidence motion Phone record kills Pakistan pm Imran khan imran khan

इस्लामाबाद : लष्कराचा वरदहस्त ज्यांच्यावर आहे, त्यांचेच सरकार पाकिस्तानात तरते, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. इम्रान खान यांनाही आता लष्कराची नाराजी निर्माण झाल्यानेच नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे बोलले जाते. एका अहवालानुसार यावर्षी फेब्रुवारीमध्ये एके दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे मोटारीत बसून लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याबद्दल वेडीवाकडी बडबड करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका मंत्र्याने हे सर्व बोलणे रेकॉर्ड केले आणि काही मिनिटांनी हे कॉल रेकॉर्डिंग जनरल बाजवा यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यानंतर इम्रान खान यांच्या सरकारवर असलेला वरदहस्त लष्कराने काढून घेतला.

पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) या पक्षाने फेब्रुवारीमध्ये अविश्वास ठराव आणण्याची घोषणा केली होती. गेल्यावर्षीही इम्रान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला गेला होता. परंतु, लष्कराच्या पाठिंब्यामुळे तो सहज फेटाळला गेला होता. त्यामुळे इम्रान यावेळीही बेफिकीर होते. फेब्रुवारीत एके दिवशी इम्रान खान व त्यांचे एक मंत्री शेख रशीद एकाच मोटारीतून बनीगला येथे जात होते. त्यावेळी कुणाचातरी फोन आला व इम्रान त्या फोनवर अनेक मुद्द्यांवर बोलत होते. बोलता बोलता लष्कर प्रमुख बाजवा यांचा संदर्भ आला. त्यावेळी इम्रान यांनी बाजवा यांच्याबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य केले. शेख रशीद यांनी हे सर्व संभाषण रेकॉर्ड केले व बाजवा यांच्यापर्यंत पोहोचविले. त्यानंतर पाक लष्कराने इम्रान सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे बोलले जाते.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातील स्थिती अत्यंत खालावलेली आहे. पंतप्रधान इम्रान खान परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत होते. त्यातच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इम्रान यांनी आयएसआयचे तत्कालीन प्रमुख जनरल फैज हमीद यांची बदली पेशावरला करण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली होती. इम्रान यांचे १५५ संख्याबळ असलेले अल्पमतातील सरकार टिकविण्यात तसेच त्यांचे संख्याबळ १७९पर्यंत नेण्यात फैज आणि बाजवा यांची भूमिका महत्त्वाची होती. नंतर बाजवा यांना लष्कर प्रमुखपदी तीन वर्षे मुदतवाढ देऊन इम्रान यांनी त्यांच्या मदतीची परतफेड केली. परंतु, फैज यांची बदली रोखण्यावरून बाजवा आणि इम्रान यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.

यावेळच्या अविश्वास ठरावावेळी लष्कराने बघ्याची भूमिका घेतल्याने इम्रान खान यांचे सरकार पडणे निश्चित होते. परंतु, इम्रान यांनी अखेरच्या क्षणी खेळी करून नॅशनल असेंब्ली बरखास्त करून निवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले.

इम्रान यांची वाटचाल

अंतिम चेंडूपर्यंत लढा देण्याची सवय आहे, असे सांगणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अविश्‍वास ठरावाला सामोरे न जाताच संसद विसर्जित करून निवडणुकांचा मार्ग स्वीकारला. या पार्श्वभूमीवर राजकारणात पदार्पण केल्यापासून आतापर्यंतच्या त्यांच्या पाव शतकातील राजकीय कारकिर्दीचा हा आढावा...

  • २५ एप्रिल, १९९६ : पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (पीटीआय) या राजकीय पक्षाची स्थापना.

  • १० ऑक्टोबर, २००२ : निवडणूक जिंकून पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये प्रवेश.

  • १९ नोव्हेंबर, २००७ : लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावर टीका केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा

  • ११ मे, २०१३ : पुन्हा एकदा निवडणूक जिंकून संसदेत, जनतेला ‘नया पाकिस्तान’चे आश्‍वासन

  • २५ जून, २०१६ : पनामा पेपर्स प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात आंदोलनाची घोषणा.

  • २ नोव्हेंबर, २०१६ : आर्थिक गैरव्यवहार केल्याचा पाकिस्तान मुस्लिम लीगचा इम्रान यांच्यावर आरोप, याचिका दाखल.

  • १५ डिसेंबर, २०१७ : सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. नवाझ शरीफ आणि कुटुंबीयांविरोधात न्यायालयात सुनावणी सुरु.

  • २७ मे, २०१८ : २५ जुलैला सार्वत्रिक निवडणूक घेण्याची घोषणा

  • २८ जुलै, २०१८ : सार्वत्रिक निवडणुकीत ‘पीटीआय’चा विजय

  • १८ ऑगस्ट, २०१८ : पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून शपथविधी.

अविश्‍वास ठरावाबाबतच्या घडामोडी (२०२२)

  • ३ मार्च : माजी पंतप्रधान आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते युसुफ रझा गिलानी यांनी सिनेट निवडणुकीत अर्थमंत्री अब्दुल हफिज शेख यांचा पराभव केला.

  • ६ मार्च : अर्थमंत्र्यांच्या पराभवानंतरही इम्रान यांनी संसदेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकला.

  • ८ मार्च : महागाईवाढ रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करत विरोधकांकडून इम्रान खान यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव मांडला.

  • १९ मार्च : बंडखोर खासदारांना ‘पीटीआय’कडून नोटीस.

  • २० मार्च : अविश्‍वास ठरावावर मतदान घेण्यासाठी २५ मार्चला संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याचे जाहीर.

  • २३ मार्च : तीन मित्रपक्ष सरकारविरोधात जाऊनही राजीनामा देण्यास इम्रान यांचा नकार.

  • २५ मार्च : अविश्‍वास ठराव चर्चेला न घेताच संसदेचे कामकाज स्थगित.

  • २७ मार्च : सरकार उलथवून टाकण्याचा परदेशी शक्तींचा डाव असल्याचा इम्रान यांचा दावा.

  • २८ मार्च : पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज गट) अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव सादर केला.

  • ३० मार्च : ‘पीटीआय’चे प्रमुख मित्र पक्ष विरोधकांच्या बाजूने गेल्याने सरकार अल्पमतात.

  • ३१ मार्च : अविश्‍वास ठरावावर संसदेत चर्चा.

  • १ एप्रिल : आपल्या जीवाला धोका असल्याचा इम्रान यांचा दावा.

  • ३ एप्रिल : अविश्‍वास ठराव उपसभापतींनी रोखला.

  • ३ एप्रिल : संसद विसर्जित करण्याची इम्रान खान यांची देशाचे अध्यक्ष अरीफ अल्वी यांना शिफारस

  • ३ एप्रिल : पंतप्रधानांच्या शिफारसीनुसार संसद विसर्जित.

काय आहे पाचवे कलम?

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत इम्रान सरकारविरोधात अविश्‍वासाचा प्रस्ताव राज्यघटनेच्या पाचव्या कलमाचा आधार घेऊन उपसभापतींनी फेटाळला. सरकारच्या प्रती निष्ठा तसेच, संविधान आणि कायद्याचे पालन करण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे, असे नमूद केले आहे. १९७३ मध्ये राज्यघटनेत या कलमाचा समावेश करण्यात आला. सरकारप्रती निष्ठा राखणे, हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असून कायद्याचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे हे कलम आहे. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे. त्यामुळेच अविश्‍वास प्रस्ताव फेटाळण्यासाठी या कलमाचा आधार घेतल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com