स्वपोषी पेशींच्या संशोधनाला नोबेल

पीटीआय
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

स्टॉकहोम - आपल्यातील ‘कचरा’ वेगळा काढून त्याचा फेरवापर करून पेशी कशा पद्धतीने सुदृढ राहू शकतात, यावर मूलभूत संशोधन करणाऱ्या जपानच्या डॉ. योशिमोरी ओसुमी यांना या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

स्टॉकहोम - आपल्यातील ‘कचरा’ वेगळा काढून त्याचा फेरवापर करून पेशी कशा पद्धतीने सुदृढ राहू शकतात, यावर मूलभूत संशोधन करणाऱ्या जपानच्या डॉ. योशिमोरी ओसुमी यांना या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

पेशींच्या या स्वायत्तजीवी किंवा स्वपोषी पद्धतीला ‘ॲटोफॅगी’ असे संबोधिले जाते. या स्वपोषी पद्धतीला कारणीभूत असलेल्या जनुकांचा शोध ओसुरी यांनी लावला. पेशींच्या या फेरवापराच्या पद्धतीत बदल झाल्यास कंपवात (पार्किन्सन्स) आणि मधुमेह होण्याची शक्‍यता असते. कर्करोगापासून कंपवातापर्यंत कोणत्याही विकारामध्ये पेशींमध्ये ‘ॲटोफॅगी’ पद्धतीत काय बदल घडून येतात, याची माहिती ओसुमी यांच्या संशोधनामुळे सर्वांना कळू शकली. 

पेशींचे अस्तित्व नैसर्गिकरीत्या टिकविण्यासाठी स्वपोषी पद्धती (ॲटोफॅगी) सजीवांमध्ये वापरली जाते. बाहेरून शरीरात येणाऱ्या जीवाणू आणि विषाणूंच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचे सामर्थ्य ॲटोफॅगी या पद्धतीमुळे पेशींनी मिळते.

‘ॲटोफॅगी’पद्धतीची माहिती गेल्या ५० वर्षांपासून मानवाला झाली होती. पेशी स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी अनावश्‍यक भाग पातळ पडद्याने (मेंबरेन) गुंडाळून ठेवतात व त्याला पेशींचा जीवनरस असलेल्या ‘लायसोसोम’च्या कप्प्यात ढकलतात. तेथे त्यावर प्रक्रिया केली जाते. डॉ. ओसुमी यांनी १९८०-९०च्या दशकात ‘यीस्ट’वर प्रयोग सुरू केल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेबाबतची माहिती सर्वांना व्हायला लागली. डॉ. ओसुमी यांच्या या मूलभूत संशोधनाबद्दल त्यांना नोबेल जाहीर करण्यात आल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे. 

‘ॲटोफॅगी’ प्रक्रिया अवलंबून असलेल्या जनुकांमध्ये बदल झाले, तरी त्याचा परिणाम म्हणून कर्करोग आणि मेंदूशी संबंधित विकार होऊ शकतात, असे डॉ. ओसुमी यांनी दाखवून दिले आहे. 

डॉ. ओसुमी यांनी टोकियो विद्यापीठातून १९७४मध्ये पीएचडी मिळविली आहे. ते सध्या ‘टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’मध्ये काम करतात. मानपत्र व ८० लाख स्वीडीश क्रोनर (नऊ लाख ३६ हजार डॉलर) असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Web Title: Nobel autophagy cells research

टॅग्स