Nobel Prize 2020 : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 October 2020

2020 चा अर्थशास्त्रातील नोबेल  The Nobel Prize 2020  पुरस्काराची सोमवारी घोषणा करण्यात आली.

स्टॉकहोम- अर्थशास्त्राची एक शाखा असलेल्या लिलाव सिद्धांतामध्ये मोलाची भर टाकल्याबद्दल आणि लिलावाच्या नव्या पद्धती शोधल्याबद्दल पॉल आर. मिलग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन या अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे. रॉयल स्विडीश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस गोरान हॅन्सन यांनी आज हा पुरस्कार जाहीर केला.

सर आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ १९६९ पासून अर्थशास्त्रातील संशोधनासाठी ‘स्वेरिएस रिक्सबँक पुरस्कार’ दिला जातो. हाच पुरस्कार नोबेल पुरस्कारांमध्ये गणला जातो. दहा लाख क्रोना (११ लाख डॉलर) आणि सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. रॉबर्ट विल्सन आणि पॉल मिलग्रोम यांनी लिलाव सिद्धांताचा आणि पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्यात सुधारणा सुचविल्या आणि प्रत्यक्ष अमलातही आणल्या. यामुळे समाजाला मोठा फायदा झाला, असे पुरस्कार समितीचे प्रमुख पीटर फ्रेडरिक्सन यांनी म्हटले आहे. लिलाव प्रक्रिया कशी चालते, खरेदीदार विशिष्ट पद्धतीनेच कसे वागतात? या स्पष्ट करण्याबरोबरच या दोन्ही विजेत्यांनी त्यांच्या संशोधनाचा उपयोग करून वस्तू आणि सेवांच्या लिलावासाठी नवीन प्रक्रियाही विकसीत केली.

अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाल्याने यंदाचे सर्व नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत. गेल्या वर्षी जागतिक स्तरावरील गरीबी कमी करण्यासाठी केलेल्या संशोधनाबद्दल ‘एमआयटी’मधील दोघांना आणि हार्वर्ड विद्यापीठातील एकाला अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. १९६९ ते २०१९ या कालावधीत आतापर्यंत ५१ वेळा हा पुरस्कार जाहीर झाला असून ८४ जणांना तो वितरित करण्यात आला आहे.

 

भारतीयांना कोरोना लसीचे दोन ते तीन डोस देणे गरजेचे
 

काय केले संशोधन?

एखादी कंपनी अथवा व्यक्ती निवीदा दाखल करताना सर्वसामान्य किमतीपेक्षा कमी किमतीची निवीदा का सादर करते, याचा अभ्यास विल्सन यांनी केला. खूप मोठी बोली लावून अधिक पैसे गमावण्याची भीती त्यांना असते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. पॉल मिलग्रोम यांनी लिलावाचा एक सिद्धांत तयार करताना त्यात सर्वसामान्य किमतीबरोबरच प्रत्येक संभाव्य खरेदीदारानुसार लिलाव वस्तूच्या किमतीत बदल करण्याची सोय उपलब्ध करून दिली.

लिलाव सिद्धांत म्हणजे काय?

लिलावाचा शेवट म्हणजेच प्रत्यक्ष खरेदी ही लिलावाचे नियम, लिलावातील वस्तू अथवा सेवा आणि अनिश्‍चितता या तीन घटकांवर अवलंबून असते. लिलाव खुला आहे की मर्यादित आहे?, सहभागी झालेले किती वेळा बोली लावू शकतात?, विजेत्याने किती रक्कम अदा करावी, असे नियम महत्त्वाचे ठरतात. तसेच, वस्तूची किंमत खरेदीदारानुसार बदलत जाते की सर्वांसाठी कायम असते, यावरही बरेच अवलंबून असते. तसेच, लिलावातील वस्तूबाबत संभाव्य खरेदीदारांकडे किती माहिती आहे, याबाबतची अनिश्‍चितताही लिलावात महत्त्वाची ठरते. यालाच लिलाव सिद्धांत म्हणतात. या सिद्धांताचा वापर करून संभाव्य खरेदीदारांची वर्तणूक आणि लिलावाचा निकाल याबाबत स्पष्टीकरण देणे शक्य होते. तसेच, वस्तूला अधिकाधिक किंमत मिळविण्याच्या हेतूने लिलाव प्रक्रियेची रचना करण्यासाठीही या सिद्धांताचा वापर केला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nobel Prize 2020 in Economics awarded to Paul Milgrom and Robert Wilson