उत्तर कोरियाकडून पुन्हा अमेरिकेला चिथावण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी फेब्रुवारीच्या सुरवातीला दक्षिण कोरियाचा दौरा केला होता. या वेळी मॅटिस यांनी उत्तर कोरियाला इशारा देताना म्हटले होते की, कुठल्याही प्रकारच्या अणू हल्ल्याला तोडीस तोड उत्तर दिले जाईल, हे उत्तर कोरियाने लक्षात ठेवावे.

सोल : उत्तर कोरियाने आज बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयातर्फे देण्यात आली. अमेरिका आणि उत्तर कोरियामधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चिथावणी देण्यासाठी उत्तर कोरियाने हे पाऊल उचलले असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक वेळेनुसार आज सकाळी सात वाजून 55 मिनिटांनी बांग्योन हवाई दल तळावरून क्षेपणास्त्र डागण्यात आले. जपानी समुद्राच्या (पूर्व समुद्र) दिशेने पूर्वेकडे हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते. सुमारे पाचशे किलोमीटर लांबीचा टप्पा पार केल्यानंतर क्षेपणास्त्र समुद्रात कोसळल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. उत्तर कोरियाने आज डागलेले क्षेपणास्त्र नेमके कुठल्या प्रकारचे होते, हे अद्याप समजू शकलेले नाही, असेही प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.

उत्तर कोरियाने आपली आण्विक आणि क्षेपणास्त्र क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली असून, त्याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली असल्याची शक्‍यता दक्षिण कोरियाकडून व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिक्रिया नेमकी काय असेल, याची चाचपणी करण्यासाठी उत्तर कोरियाकडून चिथावणी दिली जात असल्याचेही सांगण्यात येते. मागील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये उत्तर कोरियाने याच हवाई तळावरून मुसुदान क्षेपणास्त्राची दोनदा चाचणी घेतली होती.

उत्तर कोरियाने 2016 मध्ये दोन अणू चाचण्या आणि अनेक क्षेपणास्त्र चाचण्या घेऊन जगाला धक्का दिला होता. अमेरिकेवर अणू हल्ला करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी उत्तर कोरिया प्रयत्नशील आहे.

अमेरिकेला आव्हान देण्याचा प्रयत्न
जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. या वेळी जपानला सर्वोतोपरी मदतीची ग्वाही ट्रम्प यांनी जपानला दिली होती. ट्रम्प आणि ऍबे यांच्यातील चर्चेच्या दरम्यान उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेत आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अमेरिकेवर अणू हल्ला करण्याइतपत उत्तर कोरियाची क्षमता विकसित नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: north korea again challenges america