उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

र्वांत दीर्घ पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची उत्तर कोरियाची ही पहिलीच वेळ आहे. प्रत्येक क्षेपणास्त्र चाचणीद्वारे उत्तर कोरिया अमेरिकेवर अण्वस्त्र टाकण्याच्या तयारीच्या दिशेने पावले टाकत आहे

सेऊल - उत्तर कोरियाने राजधानी प्यांगयांगहून आज सोडलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र थेट जपानच्या भूमीवरून झेपावत उत्तर पॅसेफिक महासागरात जाऊन कोसळळे. अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या जपानवरूनच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र सोडल्याने या भागात तणाव वाढण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी दूरध्वनीवरून चाळीस मिनिटे चर्चा केली. अमेरिकेच्या व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने उत्तर कोरियावर दबाव वाढविला जाणार असल्याचे ऍबे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राने 2700 किलोमीटरचा प्रवास केला. जपानच्या उत्तरेकडून होकाईदो बेटावरून आज पहाटे सहा वाजून दोन मिनिटांनी साधारणपणे 550 किलोमीटर उंचीवरून हे क्षेपणास्त्र झेपावले. या क्षेपणास्त्राचा वेग ताशी बारा हजार किलोमीटर इतका अफाट होता.

या वेळी जपानने आपल्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला. मात्र हे क्षेपणास्त्र पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सर्वांत दीर्घ पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची उत्तर कोरियाची ही पहिलीच वेळ आहे. प्रत्येक क्षेपणास्त्र चाचणीद्वारे उत्तर कोरिया अमेरिकेवर अण्वस्त्र टाकण्याच्या तयारीच्या दिशेने पावले टाकत आहे.

आजच्या क्षेपणास्त्रामुळे कोणत्याही प्रकाराची हानी झाली नसल्याचे तसेच किनाऱ्यावरील नौकांचीही हानी झाली नसल्याचे जपानच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. समुद्रात कोसळण्यापूर्वी क्षेपणास्त्राचे तीन तुकडे झाल्याचे वृत्त जपानच्या "एनएचके टीव्ही'ने दिले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना जपानचे पंतप्रधान शिजो ऍबे म्हणाले, ""जपानवरून आज गेलेले क्षेपणास्त्र ही गंभीर घटना असून सुरक्षेला मोठा धोका आहे. आमच्या नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी जपान सरकार कटिबद्ध आहे.''

उत्तर कोरियाकडून अशाच प्रकारे चाचण्या सुरू राहिल्या तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दक्षिण कोरियाने दिला आहे. उत्तर कोरियाने प्यांगयांग आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या सुनान येथून ही क्षेपणास्त्र चाचणी घेतली. यावर्षी या देशाने केलेली ही तेरावी क्षेपणास्त्र चाचणी आहे.

विश्‍लेषकांच्या मते,""आजच्या चाचणीनंतर जागतिक प्रतिक्रिया काय उमटतात हे पाहून उत्तर कोरिया आपल्या पुढील चाचण्यांबाबत निर्णय घेईल.''

Web Title: north korea japan missile usa