उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉंब चाचणी पूर्णपणे असमर्थनीय

पीटीआय
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

रशियानेही या अणू चाचणीचा निषेध करत तणाव टाळून शांतता निर्माण करण्याचे आवाहन केले. उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय नियम आणि ठरावांचा भंग करत केलेल्या या चाचणीचा निषेध करत असून, हा देश जगासाठी धोका बनला आहे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे

टोकियो - "उत्तर कोरियाने आज घेतलेली हायड्रोजन बॉंबची चाचणी पूर्णपणे असमर्थनीय असून, या देशाचा अणू आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम जपानसाठी अधिक धोकादायक झाला आहे,' अशा शब्दांत जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी संताप व्यक्त केला आहे. आपली चाचणी "पूर्णपणे यशस्वी' झाल्याचे उत्तर कोरियाने जाहीर करताच जपानने ही प्रतिक्रिया दिली आहे.

"उत्तर कोरियाचा अणू कार्यक्रम अत्यंत धोकादायक वळणावर असून, हा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या धोक्‍यामुळे आमच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे आजच्या चाचणीचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दांत निषेध करत आहोत,' असे ऍबे म्हणाले. उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वी जपानच्या बेटाच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्यानंतर, आज त्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ऍबे यांनी चर्चा केल्यानंतर काही तासांतच उत्तर कोरियाने चाचणी घेतली. यानंतर लगेचच ऍबे आणि ट्रम्प यांच्यात पुन्हा दूरध्वनीवरून चर्चा झाली. उत्तर कोरियावरील दबाव वाढविण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

रशियानेही या अणू चाचणीचा निषेध करत तणाव टाळून शांतता निर्माण करण्याचे आवाहन केले. उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय नियम आणि ठरावांचा भंग करत केलेल्या या चाचणीचा निषेध करत असून, हा देश जगासाठी धोका बनला आहे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. उत्तर कोरियाचा पारंपरिक शत्रू असलेल्या दक्षिण कोरियाने मात्र या चाचणीविरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाला केली आहे. उत्तर कोरियावर नवे जागतिक निर्बंध घालून त्यांच्यावर बहिष्कार घालावा, असे आवाहनही दक्षिण कोरियाने केले आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनेही या चाचणीचा निषेध केला आहे.

चीनकडूनही निषेध
बीजिंग : उत्तर कोरियाचा एकमेव मित्रदेश असलेल्या चीननेही आजच्या सहाव्या अणू चाचणीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. उत्तर कोरियाने आपल्या "अयोग्य कृत्यांना' आवर घालावा आणि तणाव कमी करण्यासाठी चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही चीनने केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून वारंवार होणाऱ्या निषेधाकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दलही चीनने उत्तर कोरियाला फटकारले आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाप्रमाणे अणू कार्यक्रम बंद करावा, असे सांगितले. या प्रदेशामध्ये शांतता निर्माण करण्यास चीन कटिबद्ध असून, त्यासाठी इतर देशांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे चीनने स्पष्ट केले.

Web Title: north korea japan usa