उत्तर कोरियाची पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

पीटीआय
मंगळवार, 30 मे 2017

सोमवारी उत्तर कोरियाने एकाच क्षेपणास्त्राची चाचणी घेतली असल्याचे समोर आले असले तरी एकापेक्षा अधिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आम्ही माहितीचा अभ्यास करत आहोत, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.

सोल : आंतरराष्ट्रीय समुदायाकडून येणारा दबाव झुगारून लावत उत्तर कोरियाने आज पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची आज चाचणी घेण्यात आली असून, ते 450 किलोमीटर अंतर पार करून दक्षिण कोरियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ समुद्रात कोसळले, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. स्कड प्रकारातील मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा उत्तर कोरियाकडे आहे. सोव्हियत युनियनने या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली होती.

मध्यम आणि लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांची काही दिवसांपूर्वीच चाचणी घेतल्यानंतर उत्तर कोरियाकडून सोमवारी पुन्हा कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्करी प्रवक्‍त्याने दिली. सोमवारी उत्तर कोरियाने एकाच क्षेपणास्त्राची चाचणी घेतली असल्याचे समोर आले असले तरी एकापेक्षा अधिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आम्ही माहितीचा अभ्यास करत आहोत, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
वाढता आंतरराष्ट्रीय दबाव आणि नव्याने अधिक कठोर निर्बंध लावण्याचा इशारा अमेरिकेने दिल्यानंतरही उत्तर कोरियाने आपला आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला आहे.

संयम पाळण्याचा चीनचा सल्ला
दरम्यान, सोमवारी घेण्यात आलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्‍यक वातावरण तयार करण्याची सूचना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर कोरियाला केली आहे. सध्या कोरियन द्वीपकल्पातील परिस्थिती अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीची बनली असून, दोन्ही बाजूंनी शांतता आणि संयम पाळावा, असे चीनने म्हटले आहे.

Web Title: north korea news missile test again