नॉर्वे जगातील सर्वांत आनंदी देश; भारत १२२ वा

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

दहशतवादाने त्रस्त पाकिस्तानने भारतावर मात करीत 80 वे स्थान मिळविले आहे तर गरीब समजला जाणारा नेपाळही भारतापेक्षा आनंदी ठरला आहे. त्याचा क्रमांक 99 वा असून भूतान 97, बांगला देश 110 व श्रीलंका 120 व्या क्रमांकावर आहे

नवी दिल्ली -  भारत पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा दुःखी देश आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) "वर्ल्ड हॅपिनेस्ट रिपोर्ट 2017'मध्ये (जागतिक आनंदी अहवाल) काढलेला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक अहवालात 122 वा आहे. जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून नॉवेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वेळी प्रथम असलेला डेन्मार्क आता दुसऱ्या स्थानावर आहे.

"यूएन'च्या अहवालात एकूण 155 देशांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या सोमवारी आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा करण्यात आला. त्या वेळी या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यात भारताचा क्रमांक 122 वा असून गेल्या वर्षी तो 118 व्या स्थानी होता. यंदा त्यात चार क्रमांकाने घसरण झाली आहे. यंदा चीन, पाकिस्तान, नेपाळ, इराक हे देश भारताच्या पुढे गेले आहेत.

हे क्रमांक ठरविताना संबंधित देशांमधील नागरिकांचे उत्पन्न, आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार व निस्वार्थीपणा या घटकांची पाहणी करण्यात आली होती. असमतोल, विश्‍वासाचे नाते म्हणजेच सरकारी व उद्योग पातळीवर भ्रष्टाचार मुक्त कारभार, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत दरडोई उत्पन्न हेही लक्षात घेण्यात आले. तसेच आनंदाचे मूल्यमापन एक ते दहा क्रमांकात करण्यात आले आहे.

सर्वांत आनंदी देशांचा अहवाल तयार करण्यास "यूएन'ने 2012 पासून सुरवात केली. जे देश विकासात मागे पडले आहेत त्यांना मार्ग दाखविणे हा याचा उद्देश आहे. अहवालात नॉर्वे, डेन्मार्क, आइसलंड, स्विर्त्झंलंड व फिनलंड या देशांनी पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश शेवटच्या क्रमांकावर आहे. पश्‍चिम युरोप व उत्तर अमेरिकेनेही यात वरचे स्थान मिळविले आहे. यानुसार अमेरिका 14 व्या तर ब्रिटन 19 व्या स्थानावर आहे.

पाकिस्तानची बाजी
दहशतवादाने त्रस्त पाकिस्तानने भारतावर मात करीत 80 वे स्थान मिळविले आहे तर गरीब समजला जाणारा नेपाळही भारतापेक्षा आनंदी ठरला आहे. त्याचा क्रमांक 99 वा असून भूतान 97, बांगला देश 110 व श्रीलंका 120 व्या क्रमांकावर आहे. सतत संकटांचा सामना करणारा अफगाणिस्तान 141 व्या स्थानावर आहे. मालदिवचा समावेश या अहवालात नाही.

Web Title: Norway beats Denmark to be named happiest country