भारत सर्वांत दुःखी देश

पीटीआय
बुधवार, 22 मार्च 2017

"यूएन'चा आनंदी देशांचा अहवाल जाहीर; नॉर्वे ठरला सरस, भारत 122 व्या स्थानावर 

"यूएन'चा आनंदी देशांचा अहवाल जाहीर; नॉर्वे ठरला सरस, भारत 122 व्या स्थानावर 

नवी दिल्ली : भारतात आनंद साजरा करण्यास निमित्त लागते. सण-उत्सवांची रेलचेल तर असतेच, शिवाय कौटुंबिक, सामाजिक स्तरावरील चांगल्या घटनांमुळे भारतीय लोक आनंदित होतात. मात्र, भारत पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा दुःखी देश आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) "वर्ल्ड हॅपिनेस्ट रिपोर्ट 2017'मध्ये (जागतिक आनंदी अहवाल) काढलेला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक अहवालात 122 वा आहे. जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून नॉर्वेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वेळी प्रथम असलेला डेन्मार्क आता दुसऱ्या स्थानावर आहे. 
"यूएन'च्या अहवालात एकूण 155 देशांचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस सोमवारी (ता.20) साजरा करण्यात आला. त्या वेळी या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यात भारताचा क्रमांक 122 वा असून, गेल्या वर्षी तो 118 व्या स्थानी होता. यंदा त्यात चार क्रमांकाने घसरण झाली आहे. त्यामुळे यंदा चीन, पाकिस्तान, नेपाळ, इराक हे देश भारताच्या पुढे गेले आहेत. हे क्रमांक ठरविताना संबंधित देशांमधील नागरिकांचे उत्पन्न, आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार व निःस्वार्थीपणा या घटकांची पाहणी करण्यात आली होती. असमतोलता, विश्‍वासाचे नाते म्हणजेच सरकारी व उद्योग पातळीवर भ्रष्टाचार मुक्त कारभार, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत दरडोई उत्पन्न हेही लक्षात घेण्यात आले. तसेच आनंदाचे मूल्यमापन एक ते दहा क्रमांकात करण्यात आले आहे. 
सर्वांत आनंदी देशांचा अहवाल तयार करण्यास "यूएन'ने 2012 पासून सुरवात केली. जे देश विकासात मागे पडले आहेत त्यांना मार्ग दाखविणे हा याचा उद्देश असल्याचे सांण्यात येते. अहवालात नॉर्वे, डेन्मार्क, आइसलंड, स्विर्त्झलंड व फिनलंड या देशांनी पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश शेवटच्या क्रमांकावर आहे. पश्‍चिम युरोप व उत्तर अमेरिकेनेही यात वरचे स्थान मिळविले आहे. यानुसार अमेरिका 14 व्या, तर ब्रिटन 19 व्या स्थानावर आहे. आफ्रिकन देश व संघर्ष पाचवीला पूजलेल्या देशांची कामगिरी फारशी चांगली हे या अहवालातून दिसून आले. 155 मध्ये 152 क्रमांकावर सीरिया असून येमेन, दक्षिण सुदान यांसारखे दुष्काळी देश अनुक्रमे 146 व 147 व्या स्थानावर आहेत. 
 

Web Title: Norway happiest country, India ranks 122 in the World Happiness Report