युरोप पुन्हा पर्यटकांनी गजबजणार...

ब्रिटनमध्ये बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले असून तेथे अनलॉकची पूर्ण तयारी झाली आहे.
europian country
europian country Team esakal

पॅरिस: कोरोना संसर्गाच्या काळात बंद असलेले युरोप आता खुले होत आहे. तब्बल वर्षभरानंतर युरोपात अमेरिका आणि अन्य देशातील पर्यटकांसाठी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यादरम्यान पर्यटकांना कोविडच्या प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. गेल्यावर्षी युरोप कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’होते.

अमेरिका, युरोपसह जगभरात लसीकरणाला वेग आला असून संसर्गाचा वेग मंदावत चालला आहे. लसीकरण प्रक्रिया राबविली जात असल्याने युरोपीय देशात अनेक भागात फिरण्यावरचे निर्बंध काढण्यात येत आहेत. यात ब्रिटनमध्ये बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले असून तेथे अनलॉकची पूर्ण तयारी झाली आहे. ब्रिटिश सरकार येत्या २१ जूनपासून संपूर्ण देश अनलॉक करण्याचा विचार करत आहे. सध्या युरोपातील ३० पैकी २० देश अनलॉक होत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटली, स्पेन, फ्रान्समध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळ आणि आंतरराष्ट्रीय प्रवास हे नियम आणि अटींसह सुरू होत आहे. येत्या आठवड्यात व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे पहिल्यांदा युरोपीय संघाचे दरवाजे परदेशातील नागरिकांना बंद करण्यात आले होते.

फ्रान्स: फ्रान्सने भारतासह दक्षिण आफ्रिका, ब्राझील यासह १६ देशांच्या पर्यटकांवर बंदी घातली आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांना परवानगी दिली आहे. परंतु संबंधित लशीला युरोपिय युनियनची मान्यता असणे गरजेचे आहे. फ्रान्समध्ये सीमा खुल्या झाल्या असून युरोपबाहेरील देशातील नागरिकांना कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यास प्रवेश दिला जाणार आहे.

इटली: अमेरिकी नागरिकांसाठी मे च्या मध्यापासूनच इटलीची कवाडे उघडली आहेत. परंतु इटलीत दहा दिवस क्वारंटाइन राहण्याची अट आहे. या ठिकाणी येण्यापूर्वी कोविड चाचणी करणे गरजेचे आहे. इटलीत मागच्या महिन्यात ब्रिटन आणि इस्राईलच्या पर्यटकांना परवानगी देण्यात आली आहे. संबंधितांना कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा पुरावा दाखवावा लागेल आणि तो रिपोर्ट ४८ तासांपेक्षा जुना नसावा.

ग्रीस: पर्यटनावर अवलंबून असलेल्या ग्रीसमध्ये एप्रिल महिन्यांतच अमेरिकी पर्यटकांना प्रवेश दिला गेला. आता चीन, ब्रिटनसह वीस देशांतील लोकांनाही मुभा दिली आहे. सर्वांना लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे दाखवावे लागेल. ही अट चौदा जून रोजी संपत आहे. परंतु ती पुढेही चालू ठेवतील, अशी अपेक्षा आहे.

स्पेन: अमेरिकेसह बहुतांश देशातील नागरिकांना सोमवारपासून स्पेनमध्ये प्रवेश दिला जात आहे. मात्र यासाठी लस घेणे बंधनकारक आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि चीनचे दोन डोस घेतलेल्यांना देखील परवानगी दिली आहे. कमी जोखमीच्या देशातील नागरिकांना परवानगी दिली गेली आहे. भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांवर मात्र बंदी आहे.

ब्रिटन: सध्या ब्रिटनमध्ये कमी प्रमाणात अमेरिकी पर्यटक आहेत. परकी नागरिकांसाठी दहा दिवसांचे आयसोलेशन बंधनकारक आहे. अमेरिकेहून विमान सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. अर्थात डेल्टा स्वरुपावरुन काळजी घेतली जात आहे.

युरोपिय संघाचे कोविड पर्यटन धोरण

युरोपिय संघाचे सध्या कोविड पर्यटनाबाबत कोणतेही धोरण नाही. मात्र लस घेतलेल्या नागरिकांसाठी संयुक्त डिजिटल प्रवास परवानाबाबत काम केले जात आहे. स्पेन, जर्मनी, ग्रीस, बल्गेरिया, क्रोएशिया, झेक गणराज्य, डेन्मार्क आणि पोलंडने संयुक्त डिजिटल प्रवास प्रमाणपत्र प्रणालीचा वापर सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com