ट्रम्प यांचे भेदभावाचे धोरण अयोग्य- ओबामांची टीका

पीटीआय
मंगळवार, 31 जानेवारी 2017

जेव्हा अमेरिकेची मूल्ये धोक्यात येतील तेव्हा नागरिकांनी एकत्र येऊन त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचविण्याचा घटनात्मक हक्क बजावणे हेच अपेक्षित आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयी धोरणांबाबत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अखेर आज (मंगळवार) मौन सोडले. 'लोकांच्या श्रद्धा आणि धर्म यामुळे त्यांच्यामध्ये भेदभाव करण्याच्या कल्पनेशी आपण असहमत आहोत,' असे ओबामा यांनी म्हटले आहे. 

बराक ओबामा यांनी दहा दिवसांपूर्वी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या कार्यालयाच्या वतीने निवेदन प्रसिद्ध केले आहे. 
"अध्यक्ष ओबामा यांच्या परराष्ट्र धोरणविषयक निर्णयांची तुलना केल्यास ओबामा हे तत्त्वतः धार्मिक किंवा श्रद्धांवरून व्यक्ती-व्यक्तींमध्ये भेदभाव करण्याच्या कल्पनेशी असहमत आहेत हे लक्षात येते," असे ओबामा यांचे प्रवक्ते केविन लुईस यांनी निवेदनात म्हटले आहे. 

लुईस म्हणाले, "अमेरिकेत विविध समुदायांमधील संबंध वाढत आहेत हे उल्हादायक आहे असे ओबामा यांना वाटते. अध्यक्षपदावरून ओबामांनी केलेल्या शेवटच्या भाषणात ते म्हणाले होते की, प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. केवळ निवडणुकांमध्ये नव्हे तर नेहमीच आपल्या लोकशाहीचे रक्षण करणे ही सर्व अमेरिकन नागरिकांची जबाबदारी आहे."

जेव्हा अमेरिकेची मूल्ये धोक्यात येतील तेव्हा नागरिकांनी एकत्र येऊन त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचविण्याचा घटनात्मक हक्क बजावणे हेच अपेक्षित आहे, असे लुईस यांनी सांगितले. 
 

Web Title: Obama criticises Trump over immigration policies